यंदा होळीच्या सुट्टीला लागूनच गुड फ्रायडे आल्याने भारतीयांना बुधवार ते रविवार असा सुट्टीचा आनंद घेण्यास मिळणार आहे. त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा उचलत भारतीय पर्यटकांनी दुबई व थायलंडमध्ये सुट्टी घालवण्याचे ठरवले आहे. काही पर्यटन सेवा देणाऱ्या कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघड झाली असून छोटीशी सुट्टी नजीकच्या देशात घालविण्याचा निर्णय आता अनेक भारतीय पर्यटक घेत असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.
परदेश दौऱ्यासाठी अनेक जण महिनाभरापर्यंत सुट्टी घेतात. मात्र, आता कामाचा ताण वाढत असल्याने आणि अधिक दिवस सुट्टय़ा मिळत नसल्याने देशातील पर्यटकांनी कमी कालावधीच्या सुट्टय़ांमध्ये नजीकचे देश गाठण्यास सुरूवात केली आहे. त्यात, शनिवार आणि रविवार लागून जर दोन-तीन सुट्टय़ा आल्या तर याचा पर्यटक पुरेपूर फायदा घेत आहेत. त्यातच गोवा, दिल्ली, मुंबई आदी ठिकाणी फिरायला न जाता थेट दुबई, थायलंड, सिंगापूर आदी देशात या सुट्टीच्या काळात जाणे पसंत करत आहेत. यात दुबई व थायलंडचा क्रमांक वर असून नागरिक या कमी खर्च लागणाऱ्या देशांना पसंती देत आहेत, असे काही पर्यटन सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. या सर्वेक्षणानुसार, नाताळ, नव वर्ष यांसारख्या छोटय़ा सुट्टय़ांच्या काळात पर्यटक ४४ टक्के देशातील पर्यटन स्थळे निवडत असून ६७ टक्के देशाबाहेरील पर्यटन स्थळांना पसंती देण्यात येत आहे. या ६७ टक्क्यांमध्ये दुबई व थायलंडची बहुतेकांनी निवड केली आहे.
२०१५ च्या मानाने यावर्षी हे प्रमाण अधिक आहे. या होळीच्या जोडून आलेल्या सुट्टीला सर्वाधिक महत्त्व असून या सुट्टीत बाहेर जाण्यासाठी दोन महिन्यापूर्वीपासूनच तिकीटे आरक्षित केली आहेत. मात्र, पुढील मोठय़ा सुट्टय़ांमध्ये अनेकांनी गोव्यासारख्या देशी पर्यटनस्थळासह श्रीनगर, कटरा, जयपूर आदी स्थळांना आपली पसंती दर्शविली आहे.

* सर्वेक्षणानुसार, नाताळ, नववर्ष यांसारख्या छोटय़ा सुट्टय़ांच्या काळात पर्यटक ४४ टक्के देशातील पर्यटन स्थळे निवडतात
* ६७ टक्के देशाबाहेरील पर्यटन स्थळांना पसंती देतात.