पंचांगकर्त्यांचे आवाहन
राज्यात दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर तीव्र पाणीटंचाई असताना होळी व रंगपंचमी शास्त्रापुरतीच साजरी करण्याचे आवाहन पंचांगकर्त्यांनी केले आहे. कालनिर्णय, दाते पंचांग, जन्मभूमी पंचांग, महाराष्ट्रीय पंचांग व लाटकर पंचांग यांनी एकत्र येऊन होळीसंदर्भात आवाहन केले आहे.
होळीचा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यासाठी ‘कालनिर्णय’चे जयेंद्र साळगांवकर, ‘दाते पंचांग’चे मोहन दाते, ‘जन्मभूमी पंचांग’च्या ज्योतीबेन भट्ट, पंचांगकर्ते विद्याधर करंदीकर, ‘महाराष्ट्रीय पंचांग’च्या विद्या राजंदेकर, ‘लाटकर पंचांग’चे मेघश्याम लाटकर आणि ‘रुईकर पंचांग’चे मुकुंद रुईकर आदी पंचांगकर्त्यांनी पुढाकार घेतला. वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा यासाठी होळी साजरी केली जाते. मात्र सध्या ही लहान स्वरूपात साजरी करणे आवश्यक आहे. प्रतीकात्मक पद्धतीने हे सण साजरे केल्यास लाखो लिटर पाण्याची बचत होईल, असे आवाहन या पंचांगकर्त्यांनी केले आहे.
ग्रामीण भागात नागरिकांना पाण्यासाठी वणवण
करावी लागत आहे. तसेच जनावरेही तहानलेली आहेत. त्यामुळे अशा संकटकाळात धर्मशास्त्रामध्ये आवश्यक पूजा, कर्म, उत्सव थोडक्यात साजरे करण्यास सांगितले असून केवळ कपाळी टिळा लावून धर्मशास्त्रीयदृष्टय़ा प्रतीकात्मक होळी, धूलिवंदन व रंगपंचमी साजरी करण्यात यावी, असे या पंचांगकर्त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Holi celebration in mumbai