उन्हाळी हंगामात मध्य रेल्वेच्या अवघ्या ७८ फेऱ्या कोकणात;
होळीनिमित्तानेही १२ डब्यांची एकच जादा गाडी
दरवर्षी उन्हाळी हंगामात गावी जाण्यासाठी उसळणारी गर्दी पाहून कोकण रेल्वेवर जादा विशेष गाडय़ा सोडण्याच्या प्रवाशांच्या मागण्यांना मध्य रेल्वेने पुन्हा एकदा हरताळ फासला आहे. उन्हाळी हंगामासाठी विशेष गाडय़ांचे वेळापत्रक पश्चिम व मध्य रेल्वेने जाहीर केले असून त्यात उत्तरेकडे जाणाऱ्या गाडय़ांनाच झुकते माप देण्यात आले आहे, तर कोकणात जाणाऱ्या गाडय़ांच्या अवघ्या ७८ फेऱ्या जाहीर केल्या आहेत.
पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस येथून जम्मू तावीसाठी विशेष सुपरफास्ट साप्ताहिक गाडी, तर अहमदाबाद येथून जयपूर, लखनौसाठी तसेच मंगलोरसाठी गाडय़ा सोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अहमदाबाद येथून मंगलोरसाठी ३ एप्रिल ते ६ जूनदरम्यान सुपरफास्ट वातानुकूलित गाडी सोडण्यात येणार असून ती वसई रोडमार्गे जाणार आहे. ही गाडी साप्ताहिक आहे. वांद्रे टर्मिनस येथून कोकणसाठी अद्याप एकही विशेष गाडी सोडण्याचे जाहीर करण्यात आलेले नाही.
मध्य रेल्वेकडून पश्चिम रेल्वेपेक्षा कोकणसाठी जास्त जादा गाडय़ा सोडण्यात येतात. या वेळी मध्य रेल्वेने ३३४ उन्हाळी विशेष गाडय़ांच्या फेऱ्या सोडण्याचे जाहीर केले असले तरी त्यात कोकणसाठी केवळ ७८ फेऱ्या आहेत. त्यातील २० फेऱ्या या वातानुकूलित सुपरफास्ट गाडीच्या आहेत. ही गाडी ४ एप्रिल ते ६ जून या काळात दर बुधवार-गुरुवारच्या मध्यरात्री १२.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोडण्यात येईल. तर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २ एप्रिल ते ७ जून या काळात सावंतवाडीसाठी आठवडय़ातून तीन वेळा (मंगळवार, शुक्रवार आणि रविवार) फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. मात्र, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत गाडय़ांची संख्या कमी असल्याने कोकणातील प्रवाशांची प्रतीक्षा यादी वाढत जाण्याची शक्यता आहे.
‘होळी स्पेशल’मध्येही राजस्थान, बिहारलाच झुकते माप!
होळीनिमित्त गावी जाणाऱ्या मुंबईकरांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने खास गाडय़ा राजस्थान, बिहारकडे सोडल्या आहेत. मात्र त्याच वेळी मध्य रेल्वेने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रत्नागिरीपर्यंत केवळ एक १२ डब्यांची गाडी सोडली आहे. याव्यतिरिक्त नियमित गाडय़ांचे डबे वाढविण्याबाबतही मध्य रेल्वेने अनुत्सुकता दाखवली आहे. कोकणात होळीनिमित्त मुंबईतून काही लाख प्रवासी जात असतात. केवळ रत्नागिरीपर्यंतच नव्हे, तर थेट सावंतवाडीपर्यंतच्या कोकणात चाकरमानी मंडळी होळीसाठी जात असतात. मात्र २३ मार्च ते ३१ मार्च या काळात एकच १२ डब्यांची गाडी रत्नागिरीपर्यंत चालविण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त नियमित गाडय़ांनाही अतिरिक्त डबे लावण्यात आलेले नाहीत. ही गाडीही कोकण रेल्वेच्या वतीने चालविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र रेल्वे हद्दीचा वाद कायम असल्याने ही गाडी कोकण रेल्वेची की मध्य रेल्वेची हा प्रश्न अनुत्तरित आहे.  

Story img Loader