मुंबई : होळीला काही दिवस शिल्लक राहिले असून कोकणवासियांची कोकणात जाण्याची लगबग सुरू आहे. नियमित रेल्वेगाडीचे तिकीटे आरक्षित होण्याची वाट पाहिली जात आहे. विशेष रेल्वेगाड्यांची तिकीटेही संपत आहेत. परंतु, गर्दीचा भार विभाजित करण्यासाठी जादा विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. उधना जंक्शन-मंगळुरू दरम्यान जून महिन्यापर्यंत विशेष रेल्वेगाडी धावणार आहे. होळी आणि उन्हाळी हंगामादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

या विशेष रेल्वेगाड्यांसाठी विशेष शुल्क आकारले जाणार आहे. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०९०५७ / ०९०५८ उधना जंक्शन – मंगळुरू जंक्शन – उधना जंक्शन द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी धावेल. गाडी क्रमांक ०९०५७ उधना जंक्शन – मंगळुरू जंक्शन द्वि-साप्ताहिक विशेष २ मार्चपासून सुरू झाली आहे. ही रेल्वेगाडी २९ जूनपर्यंत धावेल. ही रेल्वेगाडी दर बुधवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता उधना जंक्शन येथून निघेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०९०५८ मंगळुरू जंक्शन – उधना जंक्शन द्वि-साप्ताहिक विशेष मंगळुरू जंक्शन येथून निघेल. ही रेल्वेगाडी ३ मार्चपासून सुरू झाली आहे. ती ३० जूनपर्यंत धावेल. ही रेल्वेगाडी दर गुरुवारी आणि सोमवारी रात्री ११.१० वाजता मंगळुरू जंक्शन येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.०५ वाजता उधना जंक्शन येथे पोहचेल. या रेल्वेगाडीला वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल या स्थानकांवर थांबा असेल. या गाडीला एकूण २२ डबे असतील. त्यात द्वितीय वातानुकूलित श्रेणीचा एक डबा, तृतीय वातानुकूलित श्रेणीचे पाच डबे, शयनयान १२ डबे, सामान्य दोन डबे, एसएलआर दोन डबे असतील, अशी माहिती कोकण रेल्वेद्वारे देण्यात आली. तसेच यापूर्वीही कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. तसेच होळीदरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई ते नागपूर / मडगाव / नांदेड आणि पुणे – नागपूर दरम्यान २८ होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

Story img Loader