सभागृह नेत्यावर नगरसेविकेचा रॅगिंगचा आरोप
प्रशासनावर टीका केली तरी सभागृह नेत्यांसह ज्येष्ठ नेत्यांना त्रास होतो. लोकांच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठीच आम्ही सभागृहात येतो. परंतु सभागृह नेतेच नगरसेवकांचे रॅगिंग करतात, असा थेट आणि खळबळजनक आरोप गुरुवारी शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीत एका महिला नगरसेविकेने केला. शिवसेनेच्या जुन्या आणि नव्या नगरसेवकांमध्ये गेले अनेक महिने सुरू असलेली धुसफूस या बैठकीच्या निमित्ताने चव्हाटय़ावर आल्याचे मानले जात आहे.
शिवसेनेच्या काही ज्येष्ठ नगरसेवकांनाच वारंवार मिळणारी पदे आणि त्यांच्याकडून सातत्याने नव्या नगरसेवकांना दाबण्याचा होणारा प्रयत्न यामुळे शिवसेनेच्या नव्या नगरसेवकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. ‘कोकणी मॉल’च्या संकल्पनेवरून शिवसेनेच्या जुन्या-नव्या नगरसेवकांमध्ये गुरुवारी टक्कर झाली. प्रशासनावर टीका केली तरी सभागृहनेत्यांसह ज्येष्ठ नेत्यांना त्रास होतो. लोकांच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठीच आम्ही सभागृहात येतो, अशी थेट तोफ यामिनी जाधव यांनी सभागृहनेते यशोधर फणसे यांच्यावर डागली. कोकणातील उत्पादनांना मुंबईत प्रचंड मागणी आहे. त्यामुळे महिला बचत गटांसाठी ‘कोकणी मॉल’ योजना राबविण्याचा शिवसेनेचा मानस आहे. त्यासाठी मंडयांमधील रिकामे गाळे महिला बचत गटांना देण्यात येणार आहेत. या संदर्भात बैठकीत चर्चा सुरू होती. महिला बचत गटांमध्ये केवळ कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व ठिकाणच्या महिलांचा समावेश आहे. त्यांनाही त्यांची उत्पादने विकण्याची संधी मिळायला हवी. त्यावेळी या उपक्रमाला ‘कोकणी मॉल’ऐवजी सर्वसमावेशक नाव द्यावे, असे मत यामिनी जाधव यांनी व्यक्त केले. त्यामुळे सभागृह नेते यशोधर फणसे संतापले. तुम्ही कायम पक्षाच्या विरोधात भूमिका मांडता, असा आरोप त्यांनी केला. त्यावर हा नगरसेवकांचे रॅगिंग करण्याचा प्रकार आहे, असा प्रतिआरोप यामिनी जाधव यांनी केला. उभयतांमधील शाब्दिक चकमकीत अखेर बैठक संपुष्टात आली. बैठकीस उपस्थित राहण्यासाठी पक्षादेश काढण्यात आला होता. पायावर शस्त्रक्रिया झाली असतानाही मी या बैठकीला उपस्थित राहिले. परंतु पाय दुखू लागल्यामुळे आपण पालिका सभागृहाच्या बैठकीस बसू शकणार नाही, असे सांगण्यासाठी यामिनी जाधव सभागृह नेत्यांच्या दालनात गेल्या. तेव्हाही तब्येतीची चौकशी करण्याऐवजी फणसे यांनी आपल्यावर ओरडण्यास सुरुवात केल्याचे यामिनी जाधव यांचे म्हणणे आहे. तर आपल्या बचावासाठी पक्षाच्या विरोधात भूमिका घेता, असा आरोप करीत फणसे यांनी यामिनी जाधव यांच्यावरच टीका केली. यावर आपल्या भाषणाची प्रत बैठकीच्या इतिवृत्तात आहे, ती तपासून पाहावी, असा सल्ला त्यांनी सभागृह नेत्यांना दिला. त्याची गरज नाही, तुम्ही पक्षाच्या विरोधात बोलता, ही तुमची सवय चुकीची आहे, असा दम फणसे यांनी त्यांना भरला. त्यावर अर्थसंकल्पावरील चर्चेपूर्वी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करायला हवे होते. ते न केल्यामुळे आम्ही आमची मते मांडली. आता तुम्हीच आम्हाला भाषणे लिहून द्या, आम्ही ती सभागृहात वाचून दाखवू, असा शालजोडीतील टोला हाणत यामिनी जाधव दालनातून बाहेर पडल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा