परमबीर सिंह यांचा आणखी एक आरोप
मुंबई : तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करून खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सक्तवसुली संचालनालयासमोर(ईडी) आणखी एक खळबळजनक जबाब दिला आहे. त्यात त्यांनी धक्कादायक खुलासे केले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह देशमुख यांची नावे घेतली आहेत. वाझेला खात्यात घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह दोन मंत्र्यांचा दबाव असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
सिंह यांनी ईडीकडे नोंदविलेल्या जबाबानुसार, सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्यासाठी आणि त्याला गुन्हे शाखेतील महत्त्वाचे पद महत्त्वाचे गुन्हे तपासाला देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दबाव टाकला होता. पोलीस खात्यात परतण्यासाठी अनिल देशमुख यांनी आपल्याकडे दोन कोटींची मागणी केल्याचे पुढे वाझे याने सांगितले होते, असा धक्कादायक आरोप सिंह यांनी आपल्या जबाबात केला आहे. वाझे हा त्याच्याकडील तपासाधीन गुन्ह्यांची माहिती त्याच्या वरिष्ठांना देत होता. पुढे वरिष्ठांकडून ती माहिती मला दिली जायची किंवा वाझे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत येऊन माहिती देत होते.
काही वेळा वाझे याने थेट येऊन माहितीसुद्धा दिली आहे. तसेच वाझे हा थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना त्याच्याकडील गुन्ह्यांची माहिती देत होता. तसेच तेसुद्धा त्याला बोलावून घेऊन पुढील तपासाबाबत सूचना देत होते. अनिल देशमुख हे वाझेसाठी नंबर १ होते. असा दावासुद्धा सिंह यांनी जबाबात केला आहे.
गृह सचिवांच्या नेतृत्वाखाली असलेल्या समितीमध्ये मी सहभागी होतो. पोलीस बदल्यांमध्ये याद्या तयार करण्यात आल्यानंतर फक्त नावासाठी यादया समितीसमोर येत होत्या.
तसेच मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांच्या याद्याही गृह मंत्रालयातून येत होत्या. यातील काही याद्या परमबीर सिंह यांनी ईडीला दिल्या आहेत. तसेच सिंह यांनी या याद्या अनिल देशमुख यांच्यासह मंत्री अनिल परब यांच्याकडून अंतिम होऊन यायच्या असा आरोप केला
आहे.
वाझे याच्यावर कारागृहात आणि चौकशीवेळी त्याच्याकडून याआधी दिलेले जबाब बदलण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांकडून त्याच्यावर दबाव टाकण्यात येत आहे. न्या. चांदिवाल आयोगासमोर झालेल्या सुनावणीवेळी देशमुख यांनी वाझे याची भेट घेत जबाब बदलण्याबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्याचा दावाही सिंह यांनी जबाबात केला आहे.
चौकशीसाठी हजर
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व निलंबित पोलीस अधिकारी परमबीर सिंह मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कार्यालायात मंगळवारी हजर झाले. या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन तास चौकशी केली. पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन सुरू असलेल्या खुल्या चौकशीप्रकरणी सिंह यांना तीन वेळा समन्स बजावण्यात आला होता.
हा केंद्राच्या दबावतंत्राचा भाग – मलिक
मुंबई : परमबीर सिंह यांनी सचिन वाझेबाबत ईडीकडे दिलेल्या जबाबात महाविकास आघाडीमधील नेत्यांची नावे घेतली, अशी माहिती प्रसारित करणे हा केंद्रीय यंत्रणांच्या दबावतंत्राचा भाग आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावर सुनावणी सुरू होणार असल्याने त्या आधी वातावरणनिर्मिती करण्यासाठीचे हे डावपेच असल्याचा आरोप अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला.
परमबीर सिंह यांनी माहिती लपवली-देशमुख
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया घराजवळ सापडलेली स्फोटके व मनसुख हिरण हत्या प्रकरणाची विधानसभेत माहिती देण्यासाठी मी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना बोलावले होते. त्या दोनही प्रकरणांमध्ये सिंह यांनी चुकीची माहिती दिली. त्यानंतर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसमोरही परमबीर सिंह यांनी या प्रकरणात चुकीची माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणी वाझेला राष्ट्रीय तपास संस्थेने(एनआयए) ताब्यात घेतले. सिंह यांनी दोनवेळा या प्रकरणात सत्य लपवण्याचा प्रयत्न केल्याने ते या प्रकरणाचे सूत्रधार असल्याची शक्यता असल्यामुळे त्यांना पोलीस आयुक्त पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अनिल देशमुख यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. तसेच या वेळी ईडी बदल्यांबाबत कुठल्या मंत्र्याकडून यादी मिळाली होती का, या प्रश्नावर देशमुख यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांचे नाव घेतले आहे.