राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन वातावरण तापलेले असताना शिवसैनिक आणि राणा दांपत्य हनुमान चालिसावरुन आमने-सामने आले आहेत. राणा दांपत्याने ठाकरे कुटुंबीयांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यापासून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शनिवारी सकाळी नऊ वाजता हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे सांगितल्यानंतर शिवसैनिकांनी राणा दांपत्य राहत असलेल्या घराजवळ घेराव घातला. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राणा दांपत्य आणि शिवसैनिकांना आवाहन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“या प्रकरणात पोलीस आपले कर्तव्य पार पाडत आहेत. माझी  शिवसैनिकांनी आणि राणा दांपत्याला विनंती आहे की समजदारीने भूमिका घ्यावी. कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यायला हवी. त्यांना हनुमान चालिसा वाचायची असेल त्यांनी त्यांच्या घरी वाचावी. दुसऱ्याच्या घरी जाऊन विनाकारण ड्रामा करायचे काही कारण नाही. फारच धर्माबद्दल आवड असेल तर त्यांनी अमरावतीला किंवा त्यांच्या घरात शांततेने हनुमान चालिसा पठण करावे. मातोश्रीला जाऊन विनाकारण शिवसैनिकांचा राग त्यांनी ओढवून घेऊ नये. तसेच परिस्थिती तणावाखाली येईल असा प्रयत्न अजिबात करु नये,” असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी टिव्ही ९ सोबत बोलताना केले.

“पुढे काय करायचे आहे ते पोलिसांनी माहिती आहे. त्याप्रमाणे पोलीस कारवाई करतील. तिथे उपस्थित असलेले वरिष्ठ अधिकारी माझ्या संपर्कात आहेत. राणा दांपत्याला किती लोकांनी समजवायचे? गेलो दोन तीन दिवस विनाकारण हा ड्रामा चालू आहे. हे कशासाठी? जे काही करायचे आहे ते आपल्या घरी करा. या जगामध्ये धर्माबद्दल प्रेम असणारे लोक कमी आहेत का?” असा प्रश्नही गृहमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी शुक्रवारी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे जाहीर केले होते. शुक्रवारी राणा दांपत्य मुंबईत दाखल झाले. त्यांच्या मुंबईतील खार येथील निवासस्थानी उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home minister dilip walse patil appeals to navneet rana ravi rana to recite hanuman chalisa outside matoshri abn