मुंबई तसेच मुंब्रा येथील झोपडपट्टय़ांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू असल्याने त्यांवर धाडी घालण्याची विनंती पंतप्रधानांना करण्याबरोबरच मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दरम्यान यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. सरकारने भोंगे उतरविले नाही तर अशा मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवा, असा आदेश राज यांनी मनसैनिकांना दिला आहे. यावर बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी हा विकासाचा मुद्दा असू शकत नाही अशी खंत व्यक्त केली.
“राज्यातील महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. अजानचा भोंगा आहे म्हणून हनुमान चालिसा लावू हा काही विकासाचा मुद्दा होऊ शकत नाही. मग कधी हिंदू, मुस्लिम, जात-धर्म, दुसऱ्या राज्यात घडलेल्या घटनांचे मोर्चे राज्यात काढले जातात त्यावेळी राजकारणाचा दर्जा घसरलेला दिसत आहे”, अशी टीका त्यांनी केली.
“प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजे. अजानचे भोंगे लावायचे आहेत त्यांनी डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे. ज्यांना हनुमान चालिसा लावायची आहे त्यांनीही जरुर लावावी पण तिकडे होते त्याचवेळी लावू हे योग्य नाही. विरोधी पक्षाच्या लोकांनी कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं आहे. आम्ही कोर्टाचा आदेश मान्य करु,” असं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.
यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करण्यावरुनही टीका केली. “आज महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे तशी कधीही नव्हती. आजपर्यंत देशात अनेक सरकारं आली, पण आज केंद्रीय यंत्रणांचा वापर ज्या पद्दतीने केला जात आहे तसा आधी नव्हता,” असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
“नागपुरात एका वकिलाला अटक केलं जातं. याचा अर्थ राजकीय विरोध करुन थांबवता येत नाही त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून बदनामीचा प्रयत्न करायचा सुरु आहे. गृहमंत्री म्हणून राज्यात कायदा सुव्यवस्था राखणं माझी जबाबदारी आहे. पण आज पोलीस यंत्रणेला. प्रशासकीय यंत्रणांना, राजकारण्यांना, समाजमाध्यमांना केंद्रीय यंत्रणांची भीती दाखवली जात असेल तर आपण कुठे चाललो आहोत याचा विचार केला पाहिजे,” असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले.
“महाराष्ट्राचं राजकारण प्रगल्भ होतं. विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन कामं झाली आहेत. पण आज फक्त विरोधात बोला आणि कारवाई करु असं सुरु आहे. राज्यात पोलीस असताना केंद्रीय यंत्रणा पोलीसदेखील केंद्रातून घेऊन येत असतील तर राज्याच्या व्यवस्थेवरील केंद्र सरकारचा विश्वास किती आहे हे सिद्ध होतं. मग त्यातून षडयंत्र करत राजकीय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे,” असा आरोप दिलील वळसे पाटील यांनी केला.