पोलिसांनी मुंबईमध्ये सर्वच पक्षांना रॅली काढण्यासाठी तसेच सभा घेण्यासाठी बंदी घातली आहे. पोलिसांनी तसा अधिकृत आदेश देखील काढला आहे, त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला मुंबईमध्ये कोणताही कार्यक्रम घेता येणार नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. सध्या पोलिसांनी या रॅलीला पुढे जाण्याची परवानगी दिली असली तरी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस तिथली परिस्थिती पाहून निर्णय घेतील, असंही वळसे पाटील म्हणाले.
दरम्यान, मुंबईत एमआयएमच्या रॅलीला परवानगी नाही, पोलीस आयुक्तांनी जो आदेश दिला आहे, तोच आदेश अंतिम आहे, असं गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे रॅली काढून मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत. या रॅलीला परवानगी नसल्याचं म्हणत त्यांना अहमदनगर-औरंगाबाद सीमेजवळ अहमदनगर पोलिसांकडून अडवण्यात आलं होतं. मात्र, काही वेळाने काही अटींसह त्यांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली होती.
मुस्लीम आरक्षण, वक्फ बोर्डाशी संबंधित जमीन आणि इतर काही मागण्यांसाठी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे रॅली काढून मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत. या रॅलीला परवानगी नसल्याचं म्हणत त्यांना अहमदनगर-औरंगाबाद सीमेजवळ अहमदनगर पोलिसांकडून अडवण्यात आलं होतं. पोलिसांनी अडवल्यानंतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत आंदोलन केले होते. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचं कारण पोलिसांनी दिलं होतं. “कुणालाही त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही, आम्ही आमचं एक मिशन घेऊन मुंबईच्या दिशेनं निघालो आहोत,” अशी प्रतिक्रिया खासदार जलील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
हेही वाचा – एमआयएमच्या औरंगाबाद-मुंबई रॅलीवरून वाद, अहमदनगर सीमेवर पोलिसांसोबत झाली खडाजंगी!