अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या अटकेबाबत लोकसाबा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी २४ तासांत महाराष्ट्र सरकारकडे तपशील मागवला आहे. यापूर्वी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. पोलीस कोठडीत अमानुष वागणूक दिल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेचा तपशील सभापतींनी गृह मंत्रालयाकडून मागवला आहे. लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात खासदार नवनीत राणांनी आरोप केला आहे की, अनुसूचित जातीचा असल्याने मला पाणी दिले नाही आणि कारागृहातील शौचालय वापरण्याची परवानगी दिली नाही.

“पोलीस ठाण्यातील वागणुकीसंदर्भात मी चौकशी केली आहे. तशी काही वस्तुस्थिती आहे दिसत नाही. तरीसुद्धा नवनीत राणांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवले आहे. या पत्रावर या घटनेचा तपशील सभापतींनी गृह मंत्रालयामार्फत मागवला आहे. ही माहिती आम्ही त्यांना पाठवणार आहोत,” असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून केलेल्या आरोपांनीही गृहमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. “कोणाचं म्हणणं काही असलं तरी पोलीस कायद्यानेच कारवाई करतात. कायद्याच्या बाहेर जाऊन कोणी निर्णय घेत नाही. आतापर्यंत झालेली कारवाई कायद्याप्रमाणे झालेली असून ती योग्य आहे, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा करणाऱ्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयानेही दिलासा दिलेला नाही. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी उच्च न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याचे त्यांची याचिका फेटाळून लावली होती.

महाराष्ट्रातील अमरावती येथील अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. यामध्ये त्यांनी पोलीस कोठडीत अमानुष वागणूक दिल्याचा आरोपही केला आहे. त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यां­च्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून माझ्यावर आणि पतीवर कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी म्हटले आहे. पोलीस बंदोबस्तात पिण्याचे पाणी मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या जातीच्या आधारावर त्यांना चांगली वागणूक दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home minister dilip walse patil responds to allegations of inhumane treatment of navneet rana in police custody abn