आज सकाळपासूनच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या मुंबईतील नियोजित सभेची जोरदार चर्चा सुरू आहे. या सभेसाठी ओवैसी मुंबईत दाखल देखील झाल्याचं सांगितलं जात असलं, तरी मुंबई पोलिसांनी मात्र त्यांच्या सभेला परवानगी दिलेली नाही. आज सकाळीच मुंबईत ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधून मुंबईत एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली रॅली देखील येत आहे. त्यामुळे नेमकं मुंबईत आज काय घडणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.

ओवैसींच्या सभेविषयी दिलीप वळसे पाटील यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधिंनी विचारणा केली असता त्यांनी मुंबईतील जमावबंदीबाबत माहिती दिली. “मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी जमावबंदी लागू केली आहे. त्यासोबतच मुंबईत कोणत्याही प्रकारच्या सभा, मोर्चांना बंदी घातली आहे. त्यांना आम्ही विनंती केली आहे की आपण मुंबईत ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या संदर्भात काही घटना घडल्या आहेत. त्याची काळजी घेऊन हे टाळायला हवं”, असं वळसे पाटील म्हणाले. “हा निर्णय स्थानिक पातळीवरच होईल, त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय अंतिम असेल”, असं देखील दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

“आमच्यावर सक्तीने…”, वंदे मातरम गाण्यानं अधिवेशनाची सांगता करण्यावर एमआयएमच्या सदस्यांचा तीव्र आक्षेप!

इम्तियाज जलील यांचा दावा

दरम्यान, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात सकाळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला एमआयएम पक्षाकडून धोका असल्यामुळेच ओवैसींच्या मुंबईतील सभेला परवानगी नाकारण्यात आल्याचं ते म्हणाले होते. यासंदर्भात गृहमंतरी दिलीप वळसे पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. “एखाद्या पक्षाला धोका आहे म्हणून विरोध केला जातो हे म्हणणं बरोबर नाही. पोलीस त्यांचं कर्तव्य बजावत आहेत”, असं ते म्हणाले.

एमआयएमच्या औरंगाबाद-मुंबई रॅलीवरून वाद, अहमदनगर सीमेवर पोलिसांसोबत झाली खडाजंगी!

महापौरांना संरक्षण दिलंय, दोषींवर कारवाई होणार

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना आलेल्या धमकीच्या पत्राबाबत देखील त्यांनी माहिती दिली. “मुंबईच्या महापौरांना अर्वाच्य भाषेत पत्र आलं आहे. त्याची सरकारने नोंद घेऊन महापौर आणि त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात आलं आहे. पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात असून त्याला शिक्षा दिली जाईल”, असं ते म्हणाले.

Story img Loader