राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानावर काल काही एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक मोर्चा काढला व त्या ठिकाणी चप्पला फेकून जोरदार घोषणाबाजी केली. शिवाय, घराबाहेरच ठिय्या देत आंदोलनही केले. या प्रकारामुळे एकच खबळबळ उडाली होती. राजकीय वर्तुळातही याचे तीव्र पडसाद उमटले. यानंतर घडामोडींना वेग आला आणि पोलिसांनी आंदोलक कर्मचाऱ्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना व आंदोलक कर्मचाऱ्यांना रात्री अटक केली. त्यानंतर आज मुंबईतील किला कोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली. तिन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण घेतल्यानंतर न्यायलायने गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी तर अन्य १०९ आरोपींना १४ दिवासंची न्यायालयीन कोठडी सुनावली. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, “सविस्तर निकाल आल्यानंतर प्रतिक्रिया देता येईल. आता सद्यस्थितीत न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. माझं एवढच सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन आहे, की उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे आणि निर्णयाच्या नंतर काल जी घटना घडली. त्याप्रमाणे जो काही कायद्यानुसार निर्णय करणे आवश्यक होतं तो केलेला आहे. आता आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, सहकार्य करून त्यातून मार्ग काढला पाहिजे.”
तसेच, “शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांना मी भेटलो, मुख्यमंत्र्यासोबत हीच चर्चा झाली की, काल जो काही प्रकार घडला त्याला नक्की कोण जबाबदार आहे. कुठे कमतरता राहिली, त्यावर पुढे काय निर्णय घ्यायचा या संदर्भात चर्चा केली आणि याबाबतची सगळी चौकशी करून योग्य तो निर्णय आम्ही त्यामध्ये घेऊ.” असंही वळेस पाटील म्हणाले.
याचबरोबर, “कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात ज्या त्रूटी दिसून आलेल्या आहेत. त्या संदर्भात जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल.” अशा शब्दातं गृहमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली.
“अटकेच्या कोणत्याही प्रक्रियेचं पालन न करता मला अतिरेक्यासारखं पोलीस स्टेशनला आणलं. माझ्या जीवाला धोका आहे. दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात तक्रार केल्यामुळे माझा खून होऊ शकतो. माझ्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणली आहे,” असं गुणरत्न सदावर्ते पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काल म्हणाले होते.