मुंबई: ऑक्टोबरमध्ये मुंबईत ८२०२ घरांची विक्री झाली असून यातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्क वसूलीच्या माध्यमातून ६९८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. दसरा-दिवाळीच्या काळात घरविक्रीत वाढ होईल असे वाटत असताना घरविक्रीत म्हणावी तशी वाढ झालेली दिसत नाही. घरविक्री १० हजारांचा पल्लाही गाठू शकलेली नाही. मात्र सध्याची मालमत्ता बाजारपेठेतील परिस्थितीत पाहता ऑक्टोबरमधील घरविक्रीवर बांधकाम व्यावसायिक आणि बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी समाधान व्यक्त केले आहे.
हेही वाचा >>> पुण्यातील कचराभूमीच्या बांधकामाला उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती
चालू, २०२२ वर्षात घरविक्रीच्या आकड्यामध्ये चढउतार दिसले आहेत. जानेवारी, मे, जून आणि ऑगस्टमध्ये घरविक्री १० हजाराचा आकडा पार करू शकली नाही. मात्र त्याचवेळी या वर्षांत मार्चमध्ये घरांची विक्रमी विक्री झाली. मार्चमध्ये तब्बल १६ हजारांहून अधिक घरे विकली गेली होती. एप्रिलमध्येही ११ हुनही अधिक घरे विकली गेली. जुलैमध्येही १० हजाराच्या वर घरविक्री झाली. आता ऑक्टोबरमध्ये घरविक्री १० हजाराचा पल्ला पार करू शकली नाही.
हेही वाचा >>> मुंबईः श्वानावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाला अटक
भारतीय मानसिकतेनुसार घरखरेदीसाठी साडे तीन मुहूर्त महत्त्वाचे मानले जातात. या साडे तीन मुहूर्तातील दीड मुहूर्त हे ऑक्टोबरमध्ये होते. ते म्हणजे दसरा आणि दिवाळीचा पाडवा. असे दीड मुहूर्त असल्याने या काळात मुंबईतील घरविक्रीत वाढ होईल, असे म्हटले जात होते. पण प्रत्यक्षात म्हणावी तशी वाढ ऑक्टोबरमध्ये दिसून आली नाही. मात्र घरविक्रीत घटही झाली नाही. घरविक्री स्थिर राहिली. ऑक्टोबरमध्ये ८२०२ घरे विकली गेली असून यातून ६९८ कोटींचा महसूल मिळाला आहे. बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी मात्र ही घरविक्री समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. मालमत्ता बाजारपेठेतील वातावरण पाहता हा आकडा समाधानकारक असल्याचे क्रेडाय-एमसीएचआयचे खजिनदार प्रीतम चिवुकुला यांनी सांगितले. दरम्यान घरविक्रीला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क दरात आणि विकासकांना भराव्या लागणाऱ्या अधिमूल्यात कपात करण्याची गरज असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.