गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर पुनर्विकास (पत्राचाळ) प्रकल्पात घर खरेदी करणारे ग्राहक अखेर आता आक्रमक झाले आहेत. गेली आठ वर्षे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या या ग्राहकांनी आपल्या इमारतींना म्हाडाने त्वरित निवासी दाखला द्यावा अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी या ग्राहकांनी बुधवारी मोर्चाची हाक दिली आहे.मूळ रहिवाशांची आणि म्हाडाची फसवणूक करून एक हजार कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा गैरव्यवहार झालेला प्रकल्प म्हणजे सिद्धार्थ नगर पुनर्विकास प्रकल्प. हा प्रकल्प म्हाडाने ताब्यात घेतला असून पुनर्वसन इमारतीचे काम सुरू केले आहे.

लवकरच म्हाडाच्या अखत्यारीतील इमारतींच्या कामाला सुरुवात होणार आहे. असे असताना या प्रकल्पातील विक्रीयोग्य गाळ्यातील घरे विकासकांकडून खरेदी करणारे ग्राहक मात्र अडचणीत आले आहेत. घर खरेदी केले मात्र प्रकल्पच वादात अडकल्याने त्यांना घरे कधी आणि कशी मिळणार हा प्रश्न आहे. काही ग्राहक यासाठी उच्च न्यायालयातही गेले आहेत. मात्र अजूनही त्यांची घराची प्रतीक्षा संपलेली नसून ती कधी संपणार याचे उत्तर नाही. या पार्श्वभूमीवर प्रकल्पातील काही ग्राहकांनी आक्रमक भूमिका घेऊन बुधवारी म्हाडावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : मुंबई : सराईत गुन्हेगाराला बारा तासात अटक

विक्रीयोग्य गाळ्यातील १७०० घरे तयार असून त्यांना केवळ निवासी दाखला मिळणे बाकी आहे. मात्र म्हाडाकडुन निवासी दाखला मिळत नसल्याने घरांचा ताबा मिळत नसल्याची माहिती ग्राहक धर्मेश पदमनाभन यांनी दिली. आम्ही आयुष्यभराची कमाई हक्काच्या घरासाठी लावली आहे. आज आम्ही आर्थिक अडचणीत आहोत. या प्रकल्पात घर खरेदी करणे ही आमची चुक आहे का? सरकारने, म्हाडाने आमचाही विचार करावा आणि आमच्या इमारतीना निवासी दाखला द्यावा अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही शांततेत बुधवारी सकाळी ११.३० वाजता म्हाडावर मोर्चा काढणार आहोत. केवळ आमचे म्हणणे म्हाडासमोर ठेवणे हाच आमचा उद्देश आहे असेही ते म्हणाले.