|| रसिका मुळ्ये

मुक्त विद्यालय मंडळाची साथ; राज्यमंडळाच्या प्रमाणपत्राची समकक्षता

आपल्या पाल्याला घरातच शिक्षण देण्याचा विचार गेल्या काही वर्षांमध्ये सजग पालकांमध्ये बळावत आहे. शाळेच्या पारंपरिक मार्गाला पर्याय म्हणून गृहशिक्षण म्हणजेच ‘होमस्कूलिंग’ची परदेशात लोकप्रिय होत असलेली संकल्पना पुढील काळात आपल्याकडेही रुजण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे. कारण मुक्त विद्यालय मंडळाची गृहशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाना साथ लाभली आहे.

राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळाप्रमाणे राज्याचे मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्यात आले आहे. राज्यमंडळाच्या अख्यत्यारीत हे मंडळ कार्यरत असणार आहे. शारीरिक व्यंग, अध्ययन अक्षमता असलेले विद्यार्थी, कला किंवा क्रीडा क्षेत्रातच पुढील शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले होते. हा उद्देश असला तरी तशी थेट अट मात्र याबाबतच्या निर्णयात नमूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालकांना एका प्रमाणपत्राच्या आधारे राज्यमंडळाच्या समकक्ष शिक्षण आपल्या मुलांना देता येणार आहे.

शाळेत न जाणाऱ्या १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मूल शाळेत जात नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यायचे आहे. दहा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी पाचवीची, १३ वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी आठवीची आणि १५ वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी दहावीची परीक्षा देऊ शकतात. मुले शाळाबाह्य़ होण्याच्या भीतीला काहीसा अटकाव घालण्यासाठी १४ वर्षांखालील मुलांची मुक्त विद्यालय केंद्राचे नियमित विद्यार्थी म्हणून नोंद करण्यात येणार आहे.

समकक्षता आणि सवलत

मुक्त विद्यालय मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांशी समकक्ष असणार आहेत. राज्यमंडळाचे नियमित विद्यार्थी म्हणून दहावीची परीक्षा देताना सात विषयांची परीक्षा द्यावी लागते. त्यातील सर्वोत्तम पाच विषयांचे गुण प्रवेशासाठी ग्राह्य़ धरण्यात येतात. मात्र सर्व विषयांत उत्तीर्ण व्हावे लागते. मुक्त विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पाचच विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे. तीन भाषांऐवजी दोनच भाषा बंधनकारक करण्यात आल्या आहेत. गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र, व्यवसाय शिक्षण, कला यांपैकी कोणतेही तीन विषय परीक्षेसाठी निवडता येणार आहेत. आठवीसाठी दोन भाषा, गणित बंधनकारक असेल तर विज्ञान, समाजशास्त्रे, कला, व्यवसाय शिक्षण यापैकी दोन विषय निवडता येतील. पाचवीच्या परीक्षेसाठी दोन भाषा, गणित, परिसर अभ्यास हे विषय बंधनकारक असून चित्रकला, संगीत, नाटय़ यापैकी एक विषय निवडता येईल.

‘मुक्त विद्यालयाच्या माध्यमातून परीक्षा देता आल्या तर होमस्कूलिंगचे प्रमाण वाढू शकेल. परंतु होमस्कूलिंग हे खूप आव्हानात्मक आहे. मुलांना विषयानुरूप ज्ञान देण्याबरोबरच त्यांचे सामाजिक भान वाढवण्याची जबाबदारीही घ्यावी लागते. मात्र पालकांची तयारी असेल त्यांना मुलांना आपणच घरी शिकवावे असे वाटले तर त्यात काहीच गैर नाही.’  – वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ

होणार काय?

  • नियमित शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मूल शाळेत जात नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले की विद्यार्थ्यांना आता मुक्त विद्यालयाची परीक्षा देण्याची मुभा मिळणार आहे.
  • त्याचबरोबर नियमित विद्यार्थ्यांना सात विषयांची परीक्षा देणे बंधनकारक असताना मुक्त विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पाचच विषयांची परीक्षा देऊन राज्यमंडळाच्या प्रमाणपत्राची समकक्षताही मिळणार आहे.
  • त्यामुळे आपल्या मूलाचे ‘होम स्कूलिंग’ करण्याकडे पालकांचा कल वाढणार आहे.

Story img Loader