मुंबई : कीडनाशके, रसायनांचा अतिरेकी वापर आणि शेती करण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलांमुळे फुले, फुलोऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे राज्यातील मधपाळ अडचणीत आले आहेत. या मधपाळांना उत्तर भारतात फुलोऱ्याच्या शोधात भ्रमंती करावी लागत आहे. सध्या मधपाळ झारखंडमध्ये असून, तिथे करंजीच्या फुलोऱ्यापासून मध संकलन करीत आहेत.
राज्यात मधपाळांची नोंदणी न झाल्यामुळे त्यांची संख्या नेमकी किती, या बाबत निश्चिम माहिती नाही. पण, आजघडीला मोठ्या आणि व्यावसायिक पद्धतीने मध संकलन करणाऱ्या मधपाळांची संख्या मोठी आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे आणि फुलोऱ्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे मध संकलनासाठी बहुतेक मधपाळ आपल्या मधपेट्या घेऊन झारखंडमधील रांची जिल्ह्यात गेले आहेत. तेथील दाट जंगलातील कंरजीच्या झाडांना मोठ्या प्रमाणावर फुले आली आहेत. या फुलांपासून मध संकलन केले जात आहे. एक – दीड महिन्यात प्रति मधपेटीतून सुमारे सहा ते दहा किलो मध संकलन होण्याची शक्यता आहे.
सरसकट सर्वच झाडे, फळे आणि भाजीपाल्यांच्या फुलोऱ्यांमधून मध संकलन होत नाही. त्यामुळे जास्त मध संकलन होणाऱ्या फुलोऱ्याचा शोध मधपाळांकडून घेतला जातो. ऑक्टोबर अखेरपासून नोव्हेबर, डिसेंबरपर्यंत मधपाळ राजस्थानला जातात त्यावेळी ओवा, बाभूळ. जानेवारी, फेब्रुवारीत मोहरी आणि मार्चमध्ये कोथिंबीरच्या फुलांपासून मध संकलन होते. ऑक्टोंबरपासून मार्चपर्यंत मधपेट्या राजस्थानमध्येच असतात. या पाच महिन्यांत प्रति पेटी सरासरी २० ते २२ किलो मध मिळतो. या काळात देशभरातील हजारो मधपाळ आपल्या लाखो मधपेट्या घेऊन राजस्थानमध्ये येतात. राजस्थानमधील कोटा, झालवाड, बारन, पंजाबमधील होशियारपूर, हरियाणातील जिंद, हिस्सार, जम्मूत साधारण १४ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान मधपेट्या जातात.
राज्य सरकारकडून शून्य प्रतिसाद
मधपाळ मध संकलनासाठी वर्षभर फुलोऱ्यांच्या शोधात मधपेट्या घेऊन उत्तर भारतात भ्रमंती करतात. मधपेट्या वाहतूक करताना त्या – त्या राज्यांतील पोलिसांकडून अडवणूक केली जाते. राज्य सरकारकडे अनेकदा मधपाळ म्हणून ओळखपत्र देण्याची मागणी केली आहे. पण, आम्हाला अद्याप ओळखपत्र मिळाले नाही. महाराष्ट्र सरकारच्या कृषी, आदिवासी, वन किंवा महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोउद्योग महामंडळाकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. आमच्याकडून मध खरेदी केली जात नाही. त्यामुळे मधपाळांना मधमाश्या पालन, देशभर फिरून मध संकलन करणे आणि मधाचे वेस्टन (पॅकिंग) करण्याचे करावे लागते. महामंडळाने मध खरेदीची ग्वाही दिली तर आम्हाला मध संकलन करण्यासाठी जास्तीचा वेळ मिळेल. महामंडळाकडून मधपाळांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. महामंडळाचे अधिकारी अद्याप तांत्रिक बाबीत अडकून पडले आहेत. त्यांना प्रत्यक्ष स्थिती आणि अडचणींची कल्पनाच नाही. मधपाळांची यादीही त्यांच्याकडे नाही. मधपेटीचा आकार आणि ती कोणत्या लाकडापासून तयार करावी, यातच ते अडकून आहेत, असा गंभीर आरोप मधपाळ दिनकर पाटील यांनी केला आहे.
मधाच्या खरेदी हमी मिळावी
सरसकट सर्वच फुलांपासून मध मिळत नाही. पराग आणि मकरंद, हे दोन्ही घटक असलेल्या सूर्यफूल, तीळ, कोथिंबीर, बाजरी, मका, तूर, ओवा, बाभूळ, करंज, मोहरीच्या फुलांपासून चांगला मध मिळतो. त्यामुळे मधपेट्या घेऊन भ्रमंती करावी लागते. ग्राहकांनी थेट मधपाळांकडून मध खरेदी केला तर कमी किंमतीत दर्जेदार, भेसळमुक्त मध ग्राहकांना मिळेल. राज्य सरकारकडून फक्त मधपाळ म्हणून ओळखपत्र आणि संकलित केलेल्या मधाच्या खरेदी हमी मिळावी इतकीच अपेक्षा आहे, अशी मागणी मधपाळ दिनकर पाटील यांनी केली आहे.