‘लोकप्रतिनिधी विनम्र हवा. सन्मान मागून मिळत नाही, तो वागणुकीतून मिळत असतो,’ असे परखडपणे सुनावत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘यशवंतराव चव्हाणांचा आदर्श ठेवा,’अशा शब्दांत आमदारांचे कान टोचले. आपण कोणते आदर्श प्रशासन लोकांना दिले, याबाबत आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या विलंबाचा उल्लेख करून त्यांनी मुख्यमंत्र्यांना कानपिचक्या दिल्या व लवकर निर्णय घ्या, असा सल्लाही दिला. अधिकारांचा वापर लोकांच्या यातना कमी करण्यासाठी व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  
राज्यात सध्या आमदार विरुद्ध पोलीस असा संघर्ष उभा राहिला असून, तो मिटण्याची चिन्हे नाहीत. विधिमंडळाचे कामकाज त्यामुळे ठप्प झाले आहे. पोलीस अधिकाऱ्याला आमदारांनी मारहाण केल्याची घटना झाल्यावर पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत दोषींवर कारवाईची सूचनाही दिली होती. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या मुंबईत झालेल्या सांगता समारंभात बोलताना पवार यांनी आमदारांच्या कृतीवर टीकास्त्र सोडले आणि सध्या राज्यात निर्माण झालेल्या संघर्षांच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, ‘‘प्रशासन व लोकप्रतिनिधी ही लोकशाहीच्या गाडय़ाची दोन चाके असतात. त्यापैकी एक चाक निखळून पडते की काय, अशी मला भीती वाटते. ही परिस्थिती निर्माण झाल्याने मी अस्वस्थ आहे.’’
पवार यांनी आपल्या भाषणात, यशवंतराव चव्हाण यांच्या कर्तृत्व, दूरदृष्टी व निर्णयक्षमतेचा आढावा घेतला. जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या बैठकांमध्ये आमदार, खासदारांना स्थान देऊ नये, असे यशवंतरावांनी ठरविले. नवे नेतृत्व तयार झाले पाहिजे, त्यांच्यात निर्णयक्षमता आली पाहिजे, असा हेतू त्यामागे होता, असे पवार यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांनाही कानपिचक्या
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लवकर निर्णय घेत नाहीत आणि लालफितीच्या कारभारात प्रकल्प रखडतात, ही अनेकांची तक्रार असते. पवार यांनी आपल्या भाषणात मेट्रो प्रकल्पांचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘‘मुंबईत मेट्रो होत आहे, पुण्यात होणार आहे, असे ऐकतो आहे. पुण्याची फाईल तीन वर्षे पडून आहे. नागपूरमध्ये होणार आहे. पण हे निर्णय कधी घेणार? मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने लवकर निर्णय घ्यावेत आणि केंद्राकडे पाठवावेत.’’

Story img Loader