‘सध्याच्या परिस्थितीत आपण सगळेच एकमेकांवरचा विश्वास उडाल्यासारखे वागतो आहोत. एखादा कोणी काही करत असेल तर ते करण्यामागे त्याचा हेतू सरळ आहे हे आपल्याला पटतच नाही. अशा पध्दतीने आपण वागत असल्यामुळेच     विकृतीकडे आपली वाटचाल सुरू आहे. हे कुठेतरी आपण समाजासमोर आणायला हवे. माझ्या चित्रपटांच्या रूपाने काही प्रमाणात का होईना आपल्या आजूबाजूच्या समस्या मांडण्याचे काम मी केले. आताही मला पुन्हा तसे करावेसे वाटते आहे मात्र ते मला जमले नाही तरी अन्य कलावंतांनी, विचारवंतांनी समाजातील समस्या मांडण्याचे काम करायला हवे. त्यातूनच समाजाला जाग येईल’, असा विश्वास ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केला.
दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खडतर परिस्थितीत असामान्य क र्तृत्त्व गाजवणाऱ्या सामान्य लोकांना शोधून त्यांना ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीच्या ‘अनन्य सन्मान सोहळ्या’त पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदाही ‘झी २४ तास’ आयोजित आणि ‘लोकसत्ता’ प्रायोजित ‘अनन्य सन्मान सोहळा’ शुक्रवारी आयटीसी ग्रॅंड शेरेटन हॉटेल येथे रंगला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मनसेचे आमदार बाळा नांदगांवकर, क्रिकेटपटू अजित वाडेकर, विकास आमटे यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यात राजदत्त यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अनन्य सन्मान जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारल्यावर आनंद झाल्याचे सांगतानाच,‘पुरस्कार ही कलावंतांची भूक असते. पुरस्कारांमुळे आपण केलेली कलाकृती समाजाच्या कुठल्या स्तरापर्यंत पोहोचली आहे हे कळते. मला स्वतला चित्रपटांमधून माणसांचे चित्रण करताना अंतर्मुख होत जाणे, स्वतचा, स्वतच्या परिस्थितीचा विचार करत राहणे असे वेगवेगळे आयाम मला सापडत गेले. माझ्या आयुष्यात शिवाजीराव पटवर्धन, ठाकूरदास बंग यांसारखी माणसे मिळत गेली. त्यामुळे मला नवी दृष्टी मिळाली आणि मी घडत गेलो. आज अशी वेगळी दृष्टी देणाऱ्यांची गरज आहे’, असे आग्रही प्रतिपादन राजदत्त यांनी केले. ‘झी २४ तास’च्या या उपक्रमाचे कौतुक करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘महाराष्ट्राच्या खेडोपाडय़ातून प्रतिकूल परिस्थितीत चिकाटीने यशाचे शिखर गाठणाऱ्या नररत्नांना शोधून काढणे सरकारी यंत्रणेलाही शक्य नाही. ते काम या वृत्तवाहिनीने केले असून अनन्य सन्मानसारख्या पुरस्कारांमुळे समाजातील इतरांनाही बदल घडवून आणण्याची प्रेरणा आणि ताकद मिळेल’, असा विश्वास व्यक्त केला.
* मनमाड येथे विशेष गतिमंद मुलांसाठी ‘निगराणी’ नावाची संस्था चालवणाऱ्या सुनीता महाले यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी मुंबई विद्यापीठाचे अरूण निगवेकर आणि महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते अनन्य सन्मान देऊन गौरवण्यात आले.
* मनोरंजन क्षेत्रासाठीचा पुरस्कार कोकणाची दशावतारी कला जपण्यासाठी झटणाऱ्या अप्पा दळवी यांना संजय देवतळे आणि विनोद तावडे यांच्या हस्ते अनन्य सन्मान देऊन गौरवण्यात आले.
* उरणमध्ये कोणत्याही सोयीसुविधा नसताना धावपटू घडवण्याचे काम करणारे क्रीडा प्रशिक्षक दिलीप पाटील यांना क्रीडा क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान अजित वाडेकर आणि माधव गोठस्कर यांच्या हस्ते देण्यात आला.
* पनवेल येथे संकटात सापडलेल्यांसाठी मदतकार्य करणाऱ्या ‘निसर्गमित्र’ संस्थेचे कुमार ठाकूर यांना वीरतेसाठी अनन्य सन्मान देऊन गौरवण्यात आले.
* बालविवाहाची प्रथा रोखण्यासाठी १२ जिल्ह्य़ात काम करणाऱ्या अर्चना गरड यांना सामाजिक सेवेसाठी अनन्य सन्मान देण्यात आला.
* अकोला जिल्ह्यात सेंद्रिय पध्दतीने शेती करणाऱ्या ज्योती पागदुणे यांना कृषीक्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान तर नाशिक जिल्ह्य़ातील देव नदीला पुनरूज्जीवित करत जलसंवर्धनाचे कार्य करणाऱ्या ‘युवामित्र’ संस्थेचे सुनील पोटे यांना पर्यावरण क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान देऊन गौरवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा