देशातील वीज वितरण कंपन्यांच्या कामगिरीवर आधारित क्रमवारी केंद्रीय ऊर्जामंत्रालयाने लावली असून महाराष्ट्राला वीजपुरवठा करणाऱ्या ‘महावितरण’ कंपनीला उत्तम कामगिरीसाठी ‘अ’ दर्जा मिळाला आहे. महाराष्ट्राच्या बरोबरीने केवळ गुजरात आणि पश्चिम बंगालला हा दर्जा मिळाला आहे.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने देशातील वीज वितरण क्षेत्रातील कंपन्यांचे कामगिरीच्या आधारावर मूल्यांकन केले. वीज वितरण कंपन्यांची वित्तीय स्थिती, वितरण कंपन्यांचा लेखा-जोखा, वितरण क्षेत्रातील सुधारणा, नियामक प्रक्रियाचे पालन आदींच्या आधारे हे मूल्यांकन करण्यात आले. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना अ दर्जा देण्यात आला.
या मूल्यांकनात महाराष्ट्राची वीज वितरण कंपनी असलेल्या ‘महावितरण’ला उत्तम कामगिरीमुळे अ दर्जा मिळाला. महाराष्ट्रासोबत पश्चिम बंगाल, गुजरात या दोन राज्यांतील कंपन्यांनाच अ दर्जा मिळाला. केंद्रीय ऊर्जाराज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्लीतील कार्यक्रमात ही घोषणा केली.
गुणगौरवातही राजकारण आडवे
‘अ’ दर्जा मिळालेल्या वीज वितरण कंपन्यांच्या प्रमुखांचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्याचे ठरवण्यात आले होते. तशी कल्पनाही संबंधित वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. पण आयत्या वेळी राजकीय माशी शिंकली. सत्काराचा कार्यक्रम रद्द झाला. नुसताच दर्जा जाहीर झाला व मंत्र्यांचे भाषण झाले. ‘अ’ दर्जा मिळालेल्या राज्यांत नरेंद्र मोदी यांचे गुजरात व ममता बॅनर्जीचा बंगाल ही दोन काँग्रेसेतर आणि विरोधक असलेल्या नेत्यांची राज्ये होती. महाराष्ट्रात जरी काँग्रेसची सत्ता असली तरी ऊर्जा खाते राष्ट्रवादीकडे आहे. बहुधा या राजकारणामुळेच देशात अव्वल कामगिरी करणाऱ्या वीज कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा सत्कार रद्द झाल्याची चर्चा रंगली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा