रसिका मुळ्ये
शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) २०१३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या ३१ हजार उमेदवारांपैकी अपवाद वगळता बहुतेकांची मेहनत अजून दोन महिन्यांत वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नियमानुसार या उमेदवारांची टीईटीची वैधता जानेवारीत संपणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षक होण्यासाठी टीईटी बंधनकारक करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण परिषदेने (एनसीटीई) २०११ मध्ये याबाबत परिपत्रक काढले. त्यानंतर राज्याने २०१३ मध्ये पहिली टीईटी घेतली. राज्यातील पटपडताळणीनंतर हजारो शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे आणि शिक्षकभरतीच्या प्रक्रियेतील गोंधळामुळे शासनाने शिक्षकभरतीवर बंदी घातली. तरीही टीईटीचे आयोजन केल्यावर शिक्षणशास्त्रातील पदवी किंवा पदविका घेतलेल्या लाखो उमेदवारांनी टीईटी दिली. पहिल्या वर्षी प्राथमिक म्हणजे पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी आणि उच्च प्राथमिक म्हणजे सहावी ते आठवीच्या वर्गासाठी अशा दोन्ही गटांसाठी मिळून जवळपास सहा लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यातील ३१ हजार ७२ उमेदवार पात्र ठरले. मात्र, गेल्या सात वर्षांत यातील नोकरी मिळू शकलेल्या उमेदवारांची संख्या अत्यल्प आहे. नियमानुसार या परीक्षेची वैधता सात वर्षांची आहे. म्हणजेच परीक्षेत पात्र ठरल्यावर त्या प्रमाणपत्राआधारे सात वर्षेच नोकरी मिळू शकते. त्यानंतर प्रमाणपत्र अवैध ठरते. त्यानुसार २०१३ मध्ये राज्याच्या पहिल्या टीईटीत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्राची वैधता १३ जानेवारी २०२१ रोजी संपणार आहे. येत्या दोन महिन्यांत नोकरीची संधी न मिळणाऱ्या हजारो उमेदवारांची मेहनत वाया जाणार आहे.
टीईटीचा बाजार
पहिल्यावर्षी टीईटीबाबत बीएड, डीएड झालेल्या उमेदवारांमध्ये मोठय़ाप्रमाणावर उत्सुकता होती. या परीक्षेनंतर भरती होईल अशी आशाही होती. त्यामुळे या परीक्षेला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळाला. परीक्षा जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यात या परीक्षेच्या शिकवण्या, प्रश्नसंच याची मोठी बाजारपेठ उभी राहिली. अनेक उमेदवारांनी हजारो रुपयांचे शुल्क परीक्षेच्या तयारीसाठी खर्च केले.
दरवर्षी भर
राज्यात २०१६ हे वर्ष वगळता २०१३ पासून २०१८ पर्यंत दरवर्षी टीईटी झाली. या कालावधीत राज्यात ६९ हजार ७०६ उमेदवार पात्र ठरले आहेत. पुढील जानेवारीपासून (२०२१) दरवर्षी पात्रता प्रमाणपत्राची वैधता संपलेल्या उमेदवारांची भर पडत जाणार आहे. केंद्राची टीईटी २०११ मध्ये सुरू झाली. त्यानुसार २०११ आणि २०१२ मध्ये केंद्राची टीईटी दिलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्राची वैधता संपुष्टात आली आहे.
वर्ष परीक्षा दिलेले उमेदवार पात्र उमेदवार
२०१३ ६ लाख १९ हजार ३९१ ३१ हजार ७२
२०१४ ४ लाख १४ हजार ८३० ९ हजार ५९५
२०१५ ३ लाख २६ हजार ८३० ८ हजार ९८९
२०१७ २ लाख ९७ हजार ६७७ १० हजार ३७३
२०१८ १ लाख ७३ हजार ४४९ ९ हजार ६७७