मुंबई – अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाची दुसरी लोखंडी तुळई रेल्वे रुळावर बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता आधारासाठी उभारलेला लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे पुलाची सध्या सुरू असलेल्या बाजूवरून लवकरच अवजड वाहनांना देखील प्रवेश मिळू शकणार आहे.

अंधेरी पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाल्यानंतर आता दुसरी बाजू कधी सुरू होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. पुलाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर १५ महिन्यांनी एक बाजू सुरू होऊ शकली. यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या तुळईचे भाग दिल्लीहून मुंबईत आणण्यास सुरुवात झाली होती. दुसऱ्या तुळईचे सुटे भाग येण्यास उशीर झाला. त्यामुळे पालिकेचे नियोजनही कोलमडले होते. दुसरी बाजू सुरू करण्याची मुदतही पुढे ढकलावी लागली होती. मात्र दुसरी तुळई रेल्वे रुळांवर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही तुळई रेल्वे रुळांवर बसवण्यात आली. आता उंचावरची ही तुळई आठ मीटर खाली आणण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक मागण्यात आला आहे. परंतु, अद्याप ब्लॉक न मिळाल्यामुळे हे काम थांबले आहे. दरम्यान, गोखले पुलाची एक बाजू सध्या सुरु असून त्यावरून हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूच्या गर्डरला आधार देण्यासाठी जो सांगाडा उभारण्यात आला होता. त्याचे आडवे खांब पुलावरून जातात. त्यामुळे पुलाची जी बाजू सुरू आहे त्या बाजूवरून सध्या बसगाड्या, ट्रक, अवजड वाहने जाऊ शकत नाहीत. मात्र पुलाची तुळई स्थापन झाल्यानंतर हा सांगाडा हटवण्याचे काम सुरू झाले आहे. या सांगाड्याचे सगळे खांब हटवण्यात आले असून केवळ एकच खांब सध्या शिल्लक आहे व तो सोमवारी रात्री हटवण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे या मार्गावर लवरकच अवजड वाहने जाऊ शकतील मात्र त्याबाबतचा निर्णय वाहतूक पोलीस घेतील असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई : रेल्वे रुळांवर पाणी का साचले ? पालिका प्रशासनाचे विचार मंथन

हेही वाचा – महालक्ष्मी यात्रेनिमित्त बेस्ट उपक्रमाच्या अतिरिक्त बस सेवा

तुळई खाली आणल्यानंतर क्रॅश बॅरिअर, डांबरीकरण, पोहोच रस्त्यांची कामे, पथदिवे, मार्गिकांचे रंगकाम अशी विविध कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे भागातील पुलाचे काम दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत तसेच महानगरपालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्याचे काम दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे संपूर्ण पूल सुरु होण्यास पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत वाट बघावी लागणार आहे.