Horse Cart Race on Mumbai Highway Video Goes Viral : समाजज माध्यमांमध्ये वेगवेगळ्या घटनांचे चित्रविचित्र फोटो आणि व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. पण जिथे चालण्यासाठीही पुरेशी जागा नसते, अशा मुंबईच्या रस्त्यांवर घोडे जुंपलेल्या टांग्यांची शर्यत शक्य आहे का? असाच काहीसा प्रकार नुकताच समोर आला आहे. मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काही जणांनी चक्क टांगा शर्यत आयोजित केली होती. या शर्यतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे ‘मुंबई पुलीस सोती रहेगी हॉर्स रायडिंग होती रहेगी’ असं कॅप्शन देत पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओला सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हजारोंच्या संख्यने व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र हा प्रकार समोर आल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी मुंबई पोलीसांकडे या प्रकरणात सहभाग असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीदेखील केली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर अनेक टांगे वेगाने धावताना दिसत आहेत. याबरोबर अनेक दुचाकीस्वार देखील पाहायला मिळत आहेत जे या शर्यतीचा व्हिडीओ काढताना आणि आरडाओरड करताना दिसत आहेत.
गेल्या आठवड्यात मंगळवारी घाटकोपर आणि मुलुंड यांच्या दरम्यान ही घोडागाडी शर्यत घेण्यात आली होती. या शर्यतीचा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की तो मुंबई पोलीसांपर्यंत पोहचला. त्यानंतर या प्रकरणी घाटकोपरच्या पंत नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राण्यांवर क्रूरता, वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे आणि निष्काळजीपणा यासंबंधीच्या कलमांच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात माहिती समोर आली की, ही शर्यत परवानगी न घेता आयोजित करण्यात आली होती आणि यामध्ये सहभागी झालेले बहुतेक जण घाटकोपर पश्चिम येथील फातिमा ख्रिश्चन कम्युनिटी हॉल येथे शर्यतीच्या नियोजनासाठी एकत्र आले होते. या प्रकरणाचा पोलीसांकडून तपास केला जात आहे. मात्र अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.