मुंबई: प्राणीप्रेमी, श्वान प्रेमी अशी ओळख असलेल्या रतन टाटा यांनी महालक्ष्मी येथे प्राण्यांसाठीचे रुग्णालय उभारले आहे. महापालिका आणि टाटा ट्रस्ट यांच्यात याबाबत करार झाला होता. या रुग्णालयाचे ८० टक्के काम झाले असून लोकसभेच्या आचारसंहितेमुळे उद्घाटन न करताच हे रुग्णालय काही प्रमाणात सुरू करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या रीतसर उद्घाटनाचा कार्यक्रम मात्र राहून गेला. भटक्या कुत्र्यांना मोफत उपचारांचे रतन टाटा यांचे स्वप्न मात्र या रुग्णालयाच्या रुपाने पूर्ण झाले आहे.

मुंबईत प्राण्यांवर उपचार करण्यासाठी परळ येथे एकमेव प्राण्यांचे रुग्णालय आहे. गेल्या काही वर्षात मुंबईत भटक्या आणि पाळीव जनावरांची, कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्राण्यांमधील आजारांचे प्रमाणही वाढले आहेच पण प्राण्यांपासून माणसांना होणाऱया आजारांचेही प्रमाण वाढले आहे. मात्र मुंबईत पालिकेचा फक्त एकच दवाखाना खार येथे आहे. तर सुमारे २०० खाजगी दवाखाने आहेत. उच्चभ्रू कुटुंबाना आपल्याकडील पाळीव कुत्र्यांना, प्राण्यांना खाजगी दवाखान्याचे दर परवडतात. मात्र गरीब कुटुंबाना आपल्या पाळीव प्राण्यांवर उपचार करणे परवडत नाही. तसेच मोकाट, भटक्या जनावरांना उपचारच मिळत नाहीत. त्यामुळे अशा प्राण्यांना मोफत उपचार मिळावेत याकरीता प्राण्यांचे रुग्णालय सुरू करण्याची रतन टाटा यांची इच्छा होती. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या जागेवर टाटा ट्रस्टने रुग्णालय उभारले आहे.

हेही वाचा >>>संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पात्र झोपडीधारकांचे मरोळ-मरोशीत पुनर्वसन; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

महालक्ष्मी येथे आर्थररोड कारागृहाच्या मागील भूखंडावर ३०० प्राण्यांवर उपचार करण्याची क्षमता असलेले पालिकेचे पहिले पशू रुग्णालय उभे राहिले आहे. सर दोराबजी टाटा ट्रस्ट व मुंबई महानगरपालिका यांच्यात याबाबत ३० वर्षांचा करारही झाला होता. सर दोराबाजी टाटा ट्रस्ट यांना हे रुग्णालय बांधण्यासाठी २०१८ मध्ये कंत्राट देण्यात आले होते. ‘बांधा, वापरा’ या धर्तीवर हे रुग्णालय बांधण्यात येत असून त्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. लोकसभेच्या आचारसंहितेमुळे कोणत्याही उद्घाटनाशिवाय हे रुग्णालय सुरू करण्यात आले. या रुग्णालयाचे रीतसर उद्घाटन करण्यात येणार होते. मात्र त्यापूर्वीच टाटा यांनी जगाचा निरोप घेतला.

या रुग्णालयात आंतररुग्ण विभाग, शल्यशिकित्सा कक्ष, गायनॉकॉलॉजी कक्ष, अपघात व आपत्कालीन कक्ष, आयसीयू, कर्करुग्ण विभाग, त्वचा आजार कक्ष, शवदाहिनी, बाह्यरुग्ण विभाग, सीटीस्कॅन सेंटर, एमआरआय, रेडीओलॉजी,सोनोग्राफी, डायलिसिस सेंटर, रक्तपेढी असे २५ विभाग आहेत. तसेच भटक्या श्वानांवर, जखमी, आजारी जनावरांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.