मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या खोणी आणि शिरढोण येथील पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पात लवकरच रुग्णालय, शाळेसह खेळाच्या मैदनाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील शाळा, रुग्णालय आणि इतर सुविधांसाठी राखीव भूखंडांच्या वितरणासाठी कोकण मंडळाकडून सध्या निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. रुग्णालय, शाळेसारख्या सुविधा उपलब्ध होणार असल्याने या दोन्ही गृहप्रकल्पातील घरांना प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षा कोकण मंडळाकडून व्यक्त होत आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला परवडणाऱ्या दरात घरे देण्याच्यादृष्टीने केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोकण मंडळाकडून खोणी आणि शिरढोण येथे घरे बांधण्यात येत आहेत. आतापर्यंत या प्रकल्पातील तयार झालेल्या घरांसाठी सोडत काढण्यात आली. कोकण मंडळाकडून ५ फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेल्या २२६४ घरांच्या सोडतीत शिरढोण येथील संकेत क्रमांक ४१२ मध्ये ५२८ घरे उपलब्ध होती. मात्र या घरांना प्रतिसादच मिळाला नाही. ५२८ घरांसाठी केवळ ३२ अर्ज आले. यावेळी केवळ ३२ घरांची विक्री झाली आणि तब्बल ४९६ घरे रिक्त राहिली. तर खोणी, शिरढोणमधील अनेक घरे विक्रीवाचून रिक्त असून प्रथम प्राधान्य तत्वावरही या घरांच्या विक्रीचा प्रयत्न सुरू आहे. मात्र तरीही घरांना प्रतिसाद मिळत नसल्याने कोकण मंडळाची चिंता वाढलेली आहे. आता ग्राहकांना या घरांकडे आकर्षित करण्यासाठी या प्रकल्पातील विविध वापरासाठी राखीव असलेल्या भूखंडांचा विकास करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच खोणी आणि शिरढोणमधील शाळा, रुग्णालय, खेळाचे मैदान अशा सुविधांसाठीच्या भूखंडांच्या वितरणासाठी मंडळाने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. सध्या निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

निविदेनुसार खोणी प्रकल्पातील २४६४.६० चौरस मीटरचा भूखंड शाळेसाठी राखीव आहे. तर शिरढोणमधील ७६५.६४ चौरस मीटर आणि ५९६.६७ चौरस मीटरचे भूखंड मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठी राखीव आहे. तर २७६८.६७ चौरस मीटर आणि ३०३३.२५ चौरस मीटरचे भूखंड शाळा ,तसेच खेळाच्या मैदानासाठी राखीव आहेत. या भूखंडांच्या वितरणासाठी इच्छुकांकडून निविदा मागविण्यात आल्या असून यातून कोकण मंडळाला किती महसूल मिळणार याची माहिती उपलब्ध नाही. मात्र या सुविधा विकसित होणार असल्याने घरांना प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा मंडळाला आहे. दरम्यान, ४ मार्चपर्यंत इच्छुकांना निविदा सादर करता येणार आहेत. तर ६ मार्चला तांत्रिक निविदा खुल्या करण्यात येणार असून त्यानंतर या भूखंडांना कसा प्रतिसाद मिळतो हे स्पष्ट होईल.

Story img Loader