६१२ पैकी केवळ २१ आपत्कालीन व्यवस्थापन आराखडे 

प्रसाद रावकर

मुंबई : रुग्णालयांमध्ये होणारे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने शासकीय, पालिका आणि खासगी रुग्णालयांना आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश देऊन एक वर्ष उलटले. मात्र तरीही ६१२ पैकी केवळ २१ रुग्णालयांनी पालिकेला आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा सादर केला आहे. या वरून रुग्णालयांच्या उदासिनतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबईमध्ये छोटी-मोठी रुग्णालये, नर्सिग होमची संख्या मोठी आहे. या रुग्णालयांमध्ये मोठय़ा संख्येने रुग्ण उपचारासाठी जातात. काही रुग्णालयांमध्ये मूल चोरीचे, तसेच रुग्ण दगावल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचे प्रकार यापूर्वी काही रुग्णालयांमध्ये घडले आहेत. छोटी-मोठी आग लागण्याच्या घटनाही रुग्णालयांमध्ये घडल्या आहेत. भविष्यात अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने गेल्या वर्षी शासकीय, पालिका आणि खासगी रुग्णालयांना आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार करून सादर करण्याचे आदेश दिले होते. यासाठी ६१२ रुग्णालयांची यादी तयार करण्यात आली होती. त्यामध्ये शासकीय २८, पालिकेच्या ३२ आणि खासगी ५५२ रुग्णालयांचा समावेश होता. इतकेच नव्हे तर पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने रुग्णालयांच्या आपत्कालीन व्यवस्थापन आराखडय़ाचा मसुदा तयार करून ५ फेब्रुवारी २०२१ पासून टप्प्याटप्प्याने ३२१ रुग्णालयांना ई-मेलद्वारे पाठविले होते. तर उर्वरित रुग्णालयांचा ई-मेल नसल्यामुळे तो मिळवून त्यांना मसुदा पाठविण्याचे काम सुरू असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांचा सर्वाधिक समावेश

आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने तयार केलेल्या आराखडय़ाचा मसुदा सरकारच्या २८, पालिकेच्या ३२, तर खासगी २६१ रुग्णालयांना पाठविण्यात आला होता. परंतु सरकारच्या एका, पालिकेच्या चार, तर खासगी १६ अशा एकूण २१ रुग्णालयांनीच आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला आराखडा सादर केला आहे.

ई-मेलचा शोध सुरू

आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून आराखडय़ाचा तयार मसुदा रुग्णालयांना ई-मेलद्वारे पाठविण्यात येत आहे. मात्र यादीतील सुमारे २९१ रुग्णालयांचा ई-मेल महापालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे संबंधित रुग्णालयांचा ई-मेल मिळवून त्यांना आराखडय़ाचा मसुदा पाठविण्याचे काम सुरू आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

कारवाई करणार

 रुग्णालयांना आराखडय़ाचा मसुदा तयार करून पाठविण्यात आला आहे. या मसुद्यात केवळ माहिती नमूद करायची आहे. मात्र तेही बहुतांश रुग्णालयांच्या प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही. वरिष्ठांच्या निर्देशानुसार लवकरच रुग्णालयांना दोन स्मरणपत्रे पाठविण्यात येतील. मात्र त्यानंतरही आराखडा सादर न करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी दिला.

आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा बनवून पालिकेला सादर करण्याबाबत सर्व संबंधित रुग्णालयांना स्मरणपत्र पाठविण्यात येतील. त्यानंतरही आराखडा सादर न करणाऱ्या रुग्णालयांवर आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. 

– सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त

Story img Loader