मुंबई : दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या बांधण्यात आल्या असून या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. दरवर्षी दहीहंडी फोडताना मोठ्या प्रमाणात गोविंदा जखमी होतात. या गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारबरोबरच महानगरपालिकेची रुग्णालये सज्ज झाली आहेत.
दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या उत्साहात तरुण सकाळी घराबाहेर पडतात. मात्र हा उत्साह शिगेला पोहचण्याबरोबरच गोविंदा जखमी होण्याच्या घटना घडतात. मागील काही वर्षांमध्ये दहीहंडी फोडण्यामध्ये गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. मागील दोन वर्षांत जखमी गोविंदांची संख्या २०० वर पोहचली आहे. दरवर्षी तरुण गोविंदा मोठ्या प्रमाणात जखमी होत असल्याने व त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारच्या तसेच महानगरपालिकेची केईएम, शीव, नायर व कूपर ही रुग्णालये सज्ज झाली आहेत. नायर रुग्णालयामध्ये ट्रॉमा, शल्यचिकित्सा विभाग आणि अस्थिव्यंगशल्य चिकित्सा विभागात जखमी गोविंदांसाठी ८ ते १० खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, आवश्यक सर्व औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी सांगितले.
हेही वाा – मुंबई : चिराबाजारात संरक्षक भिंत पडून दोन मृत्यू, एक जखमी
अत्यावश्यक शल्यचिकित्सा विभाग व अस्थिव्यंगशल्य चिकित्सा विभागातील डॉक्टरांना सज्ज ठेवण्यात आले असून, जखमी गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. अपघात विभागात डॉक्टर सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे केईएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन देसाई यांनी सांगितले. सर्व रुग्णालयाच्या अधिष्ठातांना जखमी गाेविंदासाठी खाटा राखीव ठेवण्याबरोबरच आवश्यक औषधे, इंजेक्शन, मलमपट्टीचे साहित्य उपलब्ध ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अस्थिव्यंगशल्य चिकित्सक, नेत्रशल्य चिकित्सक, शल्यचिकित्सक यांना सज्ज राहण्याचे आदेश दिल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांच्या प्रमुख डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली.
दरवर्षी जखमी होणाऱ्या गोविंदाची परिस्थिती लक्षात घेता यंदा अपघात विभागामध्ये शल्यचिकित्सक, अस्थिव्यंगशल्य चिकित्सक, दंत चिकित्सक, मज्जातंतू शल्यचिकित्सक विभागातील डॉक्टरांची वैद्यक शास्त्र विभागातील डाॅक्टरांसोबत आळीपाळीने नियुक्ती करण्यात आली आहे. जेणेकरून जखमींवर तातडीने योग्य उपचार करणे शक्य होतील. तसेच अपघात विभागामध्ये १० खाटा राखीव ठेवण्यात आल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले. दक्षिण मुंबईत दहीहंडी फोडताना जखमी होणारे गोविंदा हे प्रामुख्याने सेंट जॉर्जेस रुग्णालयात आणण्यात येत असल्याने या रुग्णांसाठी १० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. गरज वाटल्यास त्यामध्ये वाढ करण्यात येईल. तसेच रुग्णांसाठी आवश्यक सर्व औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली.
मागील वर्षातील जखमी गोविंदांची आकडेवारी
वर्ष – जखमी – मृत्यू
२०१८ – ८६ – १
२०१९ – ५१ – ०
२०२२ – २०० – २
२०२३ – २०० – ०
(२०२० व २०२१ मध्ये करोना असल्याने उत्सव झाला नाही)