बहुतांशी रुग्णालयांमध्ये विशेष करून खासगी रुग्णालयांमध्ये सल्लागार (कन्सल्टंट) तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णांवर उपचार केले जातात. त्यांच्याच सल्ल्यानुसार रुग्णांवर पुढील औषधोपचारही सुरू असतात. परंतु एखाद्या रुग्णाच्या उपचारांमध्ये निष्काळजीपणा झाला आणि त्या रुग्णाला त्याचा त्रास होऊन तो जीवावर बेतला तर अशा वैद्यकीय निष्काळजीपणासाठी रुग्णालय की संबंधित सल्लागारतज्ज्ञ डॉक्टरला जबाबदार धरायचे हा प्रश्न सध्या सतत उपस्थित केला जातो. मात्र राष्ट्रीय ग्राहक आयोगाने या प्रश्नावर नुकतेच उत्तर स्पष्ट केले आहे.

२४ वर्षीय शकिला बानू हिला बरीच वर्षे हाडांचा त्रास होत होता. त्यामुळे तीन तासांपेक्षा अधिक काळ बसणे तिला शक्यच होत नव्हते आणि काही मिनिटे अधिक जरी तिने बसण्याचा प्रयत्न केला, तर तिला असह्य वेदना सहन कराव्या लागायच्या. ऐन तारुण्यात मुलीला होत असलेल्या या त्रासाने तिच्या आईवडिलांना चिंतेने ग्रासले होते. त्यांनी तिला अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. चंद्रन यांच्याकडे नेले. त्यांनी तिच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. डॉ. चंद्रन हे चेन्नईतील पद्मिनी नर्सिग होमशी संलग्न असल्याने त्यांच्याच सल्ल्यानुसार शकिला हिला ९ ऑक्टोबर २००३ रोजी याच नर्सिग होममध्ये कण्याच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर शस्त्रक्रियेचे ६२ हजार रुपये शकिलाच्या आईवडिलांनी रुग्णालयात जमा केल्यानंतर दहा दिवसांनी तिला घरी पाठवण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर शकिला पहिल्यासारखी चालू लागेल, अशी अपेक्षा ती आणि तिच्या आईवडिलांना होती. मात्र प्रत्यक्षात शस्त्रक्रियेनंतर शकिलाला अनेक दुखण्यांनी जखडले आणि तिचे जगणे असह्य होऊन बसले. शस्त्रक्रियेच्या आधी जो त्रास तिला सहन करावा लागत होता त्यात कैकपटीने भर पडली. लघवी आणि शौचाच्या संवेदनेचा अभाव, प्रखर प्रकाश, आवाज आणि गंध यांच्या अतिसंवेदनशीलतेचा त्रास तिला होऊ लागला. अर्ध्या तासाहून अधिक काळ ती बसली तर कंबर आणि पाठीत वेदना सुरू होत असत. नीट चालणेही तिला अशक्य होऊन बसले होते. एवढेच नव्हे, तर शस्त्रक्रियेनंतर तिला आकडी आणि उच्च दाबाचाही त्रास होऊ लागला. आकडीच्या त्रासामुळे तिला महिन्यानंतर पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळेस डॉ. चंद्रन यांनी शकिलाला मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारांसाठी पाठवले. मात्र संबंधित मानसोपचारतज्ज्ञाने तिला मेंदूविकारतज्ज्ञांकडे जाण्यास सांगितले. त्यांनी तिला श्रीरामचंद्र वैद्यकीय केंद्रात दाखल करण्याचा सल्लाही दिला. परंतु पहिल्या शस्त्रक्रियेमुळे शकिलाच्या आतडय़ांना बरेच नुकसान झाले होते. त्यामुळे तिच्या आतडय़ांच्या हालचालींवर परिणाम झाला होता. ही प्रक्रिया पूर्ववत करण्याच्या हेतूने तिला पुन्हा डॉ. चंद्रन यांच्याकडे उपचारासाठी जाण्यास सांगण्यात आले.

Tips To Measure Your Blood Pressure
Tips To Measure Your Blood Pressure : रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत कोणती, हात कसा ठेवावा? अचूक रीडिंग टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्या ‘या’ टिप्स
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
1 thousand 201 complaints received on C Vigil App within a month for violation of code of conduct
आचारसंहिता भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ; सी-व्हिजील ॲपवर महिन्याभरात १ हजार २०१ तक्रारी प्राप्त
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
Bogus woman doctor arrested in Gowandi
गोवंडीत बोगस महिला डॉक्टरला अटक

मुलीला होत असलेल्या वेदना असह्य झाल्याने शकिलाच्या आईवडिलांनी दुसऱ्या तज्ज्ञांकडे नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिला अपोलो रुग्णालयातील मेंदूविकारतज्ज्ञाकडे नेण्यात आले. तेथे तिचे सगळे वैद्यकीय अहवाल, शस्त्रक्रियेसाठी करण्यात आलेल्या विविध चाचण्यांचे अहवाल नव्याने तपासून पाहण्यात आले. त्यात शस्त्रक्रियेच्या वेळेस निष्काळजीपणा करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. शकिलावर शस्त्रक्रिया करताना तिचा ‘एस’ मज्जातंतू कापला गेला होता आणि मांसाचा तुकडा योग्यरीत्या बसवण्यात आला नव्हता, हेही उघड झाले. दुर्दैवाने पुढे ३१ जानेवारी २००७ रोजी शकिलाचा अखेर मृत्यू झाला.

चुकीच्या उपचारांमुळे तरुण मुलगी हातची गमवावी लागल्याचे दु:ख एकीकडे असताना इतर रुग्णांबाबत त्याचा कित्ता गिरवला जाऊ नये, म्हणून शकिलाच्या आईवडिलांनी रुग्णालय आणि डॉ. चंद्रन यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी पद्मिनी नर्सिग होम आणि डॉ. चंद्रन यांच्याविरोधात चेन्नई जिल्हा ग्राहक वाद निवारण मंचाकडे वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार नोंदवली. तसेच शकिलाच्या उपचारांसाठी आलेला खर्च, या सगळ्या प्रकाराचा झालेला त्रास आणि शकिलाचा जीव गेल्याने आयुष्यातील सगळ्यात मोठे झालेले नुकसान या सगळ्यांची भरपाई म्हणून २० लाख रुपयांची मागणी त्यांनी केली. याप्रकरणी व्यावसायिक नुकसान भरपाई देणाऱ्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स या विमा कंपनीलाही त्यांनी प्रतिवादी केले.

रुग्णालयाने या तक्रारीला उत्तर देताना डॉ. चंद्रन हे स्वतंत्र वैद्यकीयतज्ज्ञ असून रुग्णालयाशी ते केवळ तज्ज्ञ सल्लागार म्हणून संलग्न आहेत. त्यामुळे त्यांना याप्रकरणी दोषी धरता येणार नाही, असा दावा केला. तर डॉ. चंद्रन यांनी आपली बाजू मांडताना शकिलाला सात वर्षांपासून हा त्रास होत होता. तसेच शस्त्रक्रियेदरम्यान तिला हृदयाचा झटका आला होता, परंतु आपण त्याही परिस्थितीत तिचा जीव वाचवल्याचा दावा केला. शिवाय शस्त्रक्रियेच्या वेळेस शकिलाच्या कण्यातील ‘एस’ मज्जातंतू कापला गेलाच नसल्याचा दावाही त्यांनी केला. जिल्हा ग्राहक मंचानेही रुग्णालय आणि डॉ. चंद्रन यांचे हे म्हणणे मान्य करत शकिलाच्या आईवडिलांची तक्रार फेटाळून लावली. राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाकडूनही जिल्हा ग्राहक मंचाचा निर्णय योग्य ठरवण्यात आल्याने पदरी निराशा पडलेल्या शकिलाच्या आईवडिलांनी या निर्णयाविरोधात राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाकडे धाव घेतली.

२४ वर्षांच्या शकिलाला मधुमेहाचा किंवा उच्च रक्तदाबाचाही त्रास नव्हता. शिवाय तिच्या कण्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया ही ‘अत्यंत धोकादायक’ या प्रकारातही मोडत नाही. त्यानंतरही तिला शस्त्रक्रियेदरम्यान हृदयाचा झटका आला. हा हृदयाचा झटका तिला का आला याचे कुठेही स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. त्यामुळे सुनावणीच्या वेळेस आयोगाने डॉ. चंद्रन यांच्याकडे त्याबाबत विचारणा केली. मात्र त्यांनी त्याचे उत्तर देण्याचे टाळले. उलट शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याचे लपवण्यासाठी शकिलाला हृदयविकाराचा झटका आल्याची सबब डॉ. चंद्रन यांच्याकडून सांगण्यात आली. परंतु त्यांचा हा दावा वैद्यकीय व्याख्येत बसत नसल्याचे नमूद करत आयोगाने तो फेटाळून लावला व शकिला हिच्यावर शस्त्रक्रिया करताना डॉ. चंद्रन यांच्या बाजूने निष्काळजीपणा झाल्याचा ठपका आयोगाने ठेवला.

तसेच याप्रकरणी रुग्णालयाच्या जबाबदारी वा उत्तरदायित्वाबाबत निकाल देताना आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या सविता गर्ग विरुद्ध नॅशनल हार्ट इन्स्टिटय़ूट या प्रकरणाच्या निवाडय़ाचा दाखला दिला. या निवाडय़ानुसार योग्य उपचार देणे हे रुग्णालयाचे कर्तव्य असल्याचे म्हटले आहे. तसेच ज्या व्यक्ती (विशेष करून तज्ज्ञ डॉक्टर) रुग्णालयाचे कर्मचारी नाहीत, मात्र रुग्णालयाने त्यांना आपल्या पॅनेलवर नियुक्त केले आहे आणि त्यांच्याकडून रुग्णावरील उपचारांत निष्काळजीपणा झाला असेल, तर रुग्णालयसुद्धा त्याला सारखेच जबाबदार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले आहे. याच निवाडय़ाचा आधार घेत राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाने १ सप्टेंबर रोजी शकिलाप्रकरणी निकाल देताना रुग्णालयाला जबाबदार धरत तिच्या आईवडिलांना दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. ते देण्यात दिरंगाई केल्यास ही रक्कम ९ टक्के व्याजाने देण्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. शिवाय शकिलाच्या आईवडिलांना कायदेशीर लढाईसाठी आलेला खर्च म्हणून अतिरिक्त १० हजार रुपये देण्याचेही आयोगाने आदेशात म्हटले.