लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : रुग्णालयांमधील उपहारगृहांतील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामुळे रुग्णालयांना दररोज साधारणपणे १७० युनिट वीज उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यामुळे केईएम, शीव, नायर, राजावाडी आणि शिवडी क्षयरोग रुग्णालयांतील दिवे रात्रभर सुरू राहण्यास मदत होणार आहे. यासाठी जवळपास ९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमधील उपहारगृहांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात जेवण बनविण्यात येते. यातील अनेक खाद्यपदार्थ वाया जातात किंवा रुग्ण अर्धवट खाऊन फेकून देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ओला कचरा तयार होत असतो. हा कचरा क्षेपणभूमीवर पाठविण्यात येतो. मात्र आता या कचऱ्याची विल्हेवाट रुग्णालयात लावण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. त्यानुसार केईएम, शीव, नायर, राजावाडी आणि शिवडी क्षयरोग रुग्णालयामध्ये बायोमिथेन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. प्रत्येक रुग्णालयामध्ये दोन मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, त्यासाठी चार कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा-झोपडपट्टीत कचरा संकलनासाठी ई – ऑटो रिक्षा
‘शून्य कचरा’ दिशेने पाऊल
रुग्णालयात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यातून बायोगॅसची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यातून उपहारगृह, परिसरातील दिवे यासह अन्य ठिकाणच्या दिव्यांसाठी या विजेचा वापर करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून जवळपास १७० युनिट वीज निर्मिती केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास अन्य रुग्णालयात याचा विस्तार करण्यात येणार आहे.