लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये, आरोग्य केंद्रे, प्रसुतिगृहांमध्ये रुग्णांना उत्तम सुविधा मिळाव्या यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र आता महानगरपालिकेची रुग्णालये, आरोग्य केंद्रे, प्रसुतिगृहांमधील स्वच्छतेवर कटाक्षाने भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकांच्या रुग्णालयांमध्ये साफसफाई मोहीम राबविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहे. त्यानुसार दोन दिवसांपासून मुंबईतील सर्व रुग्णालयांमध्ये सफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये म्हणजे अस्वच्छता हे समीकरण नेहमीच दिसून येते. या संदर्भात रुग्ण, त्यांचे नातेवाईक, समाजसेवक यांच्याकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. तसेच वृत्तपत्रांमध्येही रुग्णालयातील अवस्छतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. मात्र महानगरपालिका प्रशासन याकडे कानाडोळा करीत होते. अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. सुधाकर शिंदे यांनी दररोज मध्यरात्री साध्या वेषात रुग्णालयांमध्ये जाऊन पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी ते रुग्णालयांमध्ये चालणारे काम, रुग्णांना मिळणारी सुविधा, रुग्णांना होणारा त्रास याचे बारकाईने निरीक्षण करीत आहेत.
आणखी वाचा-वांद्रे रिक्लेमेशन, आदर्शनगर, अभ्युदयनगर वसाहतींचा पुनर्विकास मोतीलाल नगरच्या धर्तीवर?
यादरम्यान रुग्णालय आणि परिसरामध्ये आढळणारी अस्वच्छता पाहून त्यांनी तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रुग्णालयातील परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र रुग्णालयातील पंखे, कपाट, भिंतीचे कोपरे, तावदाने, खिडक्या, दरवाजे, छत येथील जळमटे, धुळ व कचरा, अस्वच्छ शौचालये, दुर्गंधी कायम आहे. त्यामुळे केवळ रुग्णालय परिसर स्वच्छ करून उपयोग नाही. संपूर्ण रुग्णालयातच स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक आहे. यादृष्टीने त्यांनी रुग्णालयांच्या सफाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये, प्रसुतिगृहे, आरोग्य केंद्रांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून साफसफाई नेटाने सुरू आहे.
रुग्णालये स्वच्छ असणे हे रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तसेच रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत होत असलेल्या टीकेमुळेच ही स्वच्छता राबविण्यात येत आहे. यापुढेही रुग्णालये स्वच्छ ठेवण्यात येतील, असे डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.