लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील तापमानात चढ – उतार होत आहे. मुंबईमधील किमान तापमानात वाढ झाली असली तरी गेल्या एक – दोन दिवसांपासून कमाल तापमान स्थिर आहे. दरम्यान, मुंबईत पुढील काही दिवस उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज कायम आहे. या कालावधीत तापमानात वाढ होण्याची शक्यता नसली तरी उष्ण व दमट वातावरणामुळे बैचेन होईल.
गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाचा ताप, तसेच उष्मा अधिक जाणवत असल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३३ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सध्या मुंबईत सकाळी सात- साडेसात वाजल्यापासून अगदी सायंकाळपर्यंत अंगाची लाही लाही होत आहे. या उकाड्यापासून सुटका होणे दूरच, उलट तो कायम राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे पुढील काही दिवस मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होण्याची शक्यता नाही. दरम्यान, मागील काही दिवसांत तापमानात वाढ झालेली आहे. यामुळे मुंबई, ठाणे, पालघर परिसरात तीव्र उकाडा जाणवत आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे त्यात भर पडत आहे.
कडकडीत ऊन, घामाच्या धारा आणि प्रचंड उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुंबईकरांना घामाच्या धारा लागत आहेत. घामामुळे शरीरातील पाणी निघून जाते. त्यामुळे गळून गेल्यासारखे वाटणे, थकवा येणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अंगाची लाही लाही करणारे ऊन आणि घामाच्या धारांनी मुंबईकर त्रस्त झाले आहेत. या कडक उन्हामुळे मुंबईकरांचे आरोग्य देखील बिघडत असून सर्दी ताप, डोकेदुखी याखेरीज डोळे कोरडे होणे, पोटदुखी हे त्रास उद्भवत आहेत.
दरम्यान, तापमानाचा पारा फारसा चढा नसला तरी सध्याच्या उष्ण वातावरणापासूनही दिलासा मिळणार नसल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा लागत आहेत. पुढील दोन महिन्यांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी तापमानात काहीशी घट झाली असली तरी दिवसभर गरम हवा आणि उन्हाचा तडाखा सहन करावा लागत होता. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे.
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज
राज्यातील तापमानवाढ कायम राहणार असून विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक जण दुपारी घरातच राहणे पसंत करीत आहेत. तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात तापमानातील वाढ कायम राहणार आहे. त्यामुळे राज्यभरात उन्हाचा चटका कायम असणार आहे.