सरत्या वर्षांला अलविदा करतानाच तमाम मुंबईकरांनी मोठय़ा जल्लोशात गुरुवारी नव्या वर्षांचे स्वागत केले. मुंबईमधील हॉटेल्स, पब, चौपाटय़ा, मैदाने मुंबईकरांच्या गर्दीने फुलून गेले होते. फटाक्यांची आतषबाजी आणि डीजेच्या दणदणाटात अवघी मुंबापुरी दुमदुमून गेली होती. मध्यरात्री हा जल्लोश टिपेला पोहोचला. मात्र, नववर्षांच्या जल्लोशाला गालबोट लागू नये म्हणून जागोजागी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.नववर्षांच्या स्वागतासाठी तमाम मुंबईकरांनी आधीच कार्यक्रमांच्या योजना आखून ठेवल्या होत्या. कुणी रिसॉर्टमध्ये, तर कुणी निसर्गाच्या सान्निध्यात नववर्षांचे स्वागत करण्याचे बेत आखून गुरुवारी दुपारीच मुंबईतून काढता पाय घेतला होता. मात्र, मुंबईतील हॉटेल्स, चौपाटय़ांवरही अनेकांनी नववर्षांच्या स्वागताचे बेत आखले होते. काही मंडळींनी हॉटेल्समध्ये डीजेच्या तालावर थिरकत नववर्षांचे स्वागत केले. तर काही मंडळींनी आपल्या कुटुंबासमवेत घरातच दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांचा आस्वाद घेणे पसंत केले. मध्यरात्रीच्या सुमारास चौपाटय़ा फटाक्यांच्या आतषबाजीने उजळून निघाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या जल्लोशात बेस्ट उपक्रमाच्या ‘नीलांबरी’ बसने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘नीलांबरी’तून नरिमन पॉइंट आणि आसपासच्या परिसरात फेरफटका मारत काही मंडळींनी जल्लोश केला. अनेक हॉटेल्समध्ये वेगवेगळे बेत आखण्यात आले होते. मराठमोळ्या पदार्थापासून विदेशी पदार्थावर ताव मारत, मद्य रिचवत नववर्षांचे स्वागत केले. मध्यरात्री १२च्या सुमारास नरिमन पॉइंट आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक खोळंबली होती. मोठय़ा संख्येने वाहने या भागात आल्यामुळे अनेकांना वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागला. जुहू चौपाटीवर कलाकाराने साकारलेल्या शांती संदेश देणाऱ्या वालुकाशिल्पानेही मुंबईकरांचे लक्ष वेधले होते. नववर्षांच्या जल्लोशाला गालबोट लागू नये म्हणून रस्त्यावर ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. मध्यरात्रीनंतर मद्यपी चालकांची मोठय़ा प्रमाणावर धरपकडही करण्यात आली. मध्यरात्रीनंतर मात्र काही अतिउत्साही मंडळींना पोलिसांकडून ‘प्रसाद’ मिळाला.जल्लोशासाठी ठिकठिकाणी जाणाऱ्या मुंबईकरांना सुखरूपपणे घरी पोहोचता यावे यासाठी रेल्वेने मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विशेष गाडय़ा सोडल्या होत्या. त्यामुळे मध्यरात्रीनंतर चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानके गर्दीने फुलून गेली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hotel pub chowpatty ground are full for new year celebration