मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ योजनेतील म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०१६ च्या सोडतीतील ३०५ विजेत्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होत असतानाच आता पुनर्विकास योजनेतील मूळ ६७२ भाडेकरूंचेही हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या भाडेकरूंची हक्काच्या घराची प्रतीक्षा तब्बल १७ वर्षांनंतर संपुष्टात येणार आहे. पत्राचाळ पुनर्विकास योजनेतील पुनर्वसित इमारतींसाठी निवासी दाखला घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या इमारतींना निवासी दाखला मिळण्याची शक्यता आहे. दाखला मिळाल्यानंतर या भाडेकरूंना भव्य सोहळ्यात घरांचा ताबा दिला जाण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत तेथील ६७२ मूळ भाडेकरूंची घरे २००८ मध्ये रिकामी करुन घेत पुनर्विकासाला सुरुवात करण्यात आली. मात्र मूळ विकासकांनी पुनर्विकास अर्धवट सोडला आणि पुनर्विकासात मोठा आर्थिक गैरव्यवहार केला. त्या विरोधात राज्य सरकारकडून विकासकाविरोधात कठोर कारवाई करण्यात आली. दुसरीकडे हा प्रकल्प विकासकाकडून काढून घेत म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे वर्ग करण्यात आला. प्रकल्प मंडळाकडे आल्यानंतर मंडळाने ६७२ घरांचा समावेश असलेल्या पुनर्वसित इमारतीसह ३०५ घरांचा समावेश असलेल्या सोडतीतील घरांच्या इमारतीच्या कामाला २०२२ मध्ये सुरुवात केली. ही कामे नुकतीच पूर्ण करून मंडळाने पुनर्वसित आणि सोडतीतील इमारतीसाठी निवासी दाखला घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. मात्र इमारतीत काही त्रुटी असल्याने निवासी दाखला मिळवण्यात मंडळाला यश येत नव्हते. अखेर मंडळाने सर्व त्रुटी दूर करून काही दिवसांपूर्वी सोडतीतील इमारतीसाठी निवासी दाखला मिळवला आहे. आता मुंबई मंडळाकडून पुनर्वसित इमारतींच्या निवासी दाखल्यासाठीचा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – वर्षभरात २४ हजार मुलांवर मोफत शस्त्रक्रिया, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमअंतर्गत मोहीम

हेही वाचा – मुंबई : कांजुरमार्ग येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा खून, मेट्रो कारशेड परिसरात सापडला होता मृतदेह

पुनर्वसित इमारतींनाही आता लवकरच निवासी दाखला मिळणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान म्हाडाकडून राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात पत्राचाळीतील ६७२ भाडेकरूंना घराचा ताबा देण्याचा कार्यक्रम समाविष्ट आहे. त्यामुळे पत्राचाळीतील मूळ भाडेकरूंना मोठ्या सोहळ्यात घरांच्या चाव्या वितरीत केल्या जाण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत चित्र स्पष्ट होईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House for patrachawl people patrachawl yojana mhada mumbai print news ssb