मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घर आता पती-पत्नीच्या संयुक्त नावे नोंदणीकृत करण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबईने घेतला आहे. झोपु प्राधिकरणाने मुंबईत या निर्णयाची अंमलबजाणी सुरू केली आहे. आता बृहन्मुंबई झोपु प्राधिकरणापाठोपाठ मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानेही पती-पत्नीच्या नावे घराची संयुक्त नोंदणी करण्यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे आता हा निर्णय एमएमआरमधील झोपु योजनांसाठीही लागू होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी झोपु योजना राबविली जात असून आतापर्यंत अडीच लाख झोपड्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मुंबईपाठोपाठ एमएमआरमध्येही झोपड्यांचा प्रश्न गंभीर बनला असून एमएमआर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी २०२० मध्ये एमएमआर झोपु प्राधिकरण स्थापन करण्यात आले. आता एमएमआरमधील झोपु योजनांना गती दिली जात आहे. दरम्यान, झोपु योजना राबविताना झोपडीधारकांची पात्रता अत्यंत महत्त्वाची असते. पात्रता निश्चिती करताना मुख्यत्वे पुरुषाच्याच नावे घराची नोंद होते. त्यामुळे परिशिष्ट २ अंतर्गत पुरुषांचे नाव समाविष्ट होते. कागदपत्रे ज्याच्या नावे, त्याच्या नावे घर अशी साधारणत: पात्रता निश्चितीची प्रक्रिया असते. याप्रमाणे कागदपत्रेही बहुतांशी पुरुषांच्या नावे असतात. तेव्हा झोपु योजनेतील घर पतीच्या नावे असेल आणि पतीचे निधन झाले तर पत्नीला घर आपल्या नावावर करण्यासाठी अनेक कायदेशीर बाबींना, तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेत परिशिष्ट-२ मध्ये पती-पत्नी दोघांची नावे समाविष्ट करण्याचा, पती-पत्नीच्या नावे संयुक्तपणे घराची नोंदणी करण्याचा निर्णय झोपु प्राधिकरणाने घेतला आहे. यासंबंधीचे परिपत्रक १८ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले. या परिपत्रकानुसार निर्णयाची अंमलबजावणी मुंबईत सुरू झाल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी दिली. हा निर्णय महिलांसाठी अत्यंत दिलासादायक ठरत असल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे.

बृहन्मुंबई क्षेत्रातील झोपु योजनांसाठी हा निर्णय लागू झाल्यानंतर आता एमएमआर झोपु प्राधिकरणानेही पती-पत्नीच्या नावे घराची संयुक्त नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एमएमआर झोपु प्राधिकरणाचे जनसंपर्क अधिकारी हरिष वराडे यांनी दिली. यासंबंधीचे परिपत्रक एमएमआर झोपु प्राधिकरणाने २० फेब्रुवारी रोजी जारी केले आहे. त्यामुळे आता एमएमआरमधील झोपु योजनेतील घरे पती-पत्नीच्या नावे नोंद केली जातील, असेही वराडे यांनी सांगितले.