लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : भारताची आर्थिक राजधानी आणि बहुसंख्य नागरिकांच्या स्वप्नांना आकार देणारी मायानगरी अशी ओळख असलेल्या ‘मुंबई’ शहरात स्वतःच्या हक्काचे घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु याच मायानगरीत स्वतःचे घर घेणे आव्हानात्मक झाले आहे. तुलनेत २०२४ या वर्षात मुंबई महानगर क्षेत्रातील घरांच्या किंमतीत तब्बल १८ टक्के वाढ झाली आहे. सर्वाधिक म्हणजे तब्बल ४९ टक्के वाढ ही दिल्लीतील मालमत्तेच्या किंमतीत झाली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी ही आकडेवारी प्रॉपटायगर डॉटकॉमच्या ‘रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल अॅन्युअल राऊंडअप २०२४’ या अहवालातून समोर आली आहे.

‘प्रॉपटायगर डॉटकॉम’च्या अहवालानुसार देशातील प्रमुख ८ शहरांतील मालमत्तेच्या किंमतीत ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सर्वाधिक ४९ टक्के वाढ ही दिल्ली एनसीआरमधील मालमत्तेच्या किंमतीत झाली आहे. त्यानंतर मुंबई, पुणे, चेन्नईचा क्रमांक लागतो. देशातील प्रमुख आठ शहरांतील मालमत्तेच्या किंमती पाहिल्यास दिल्ली एनसीआरमध्ये (गुरुग्राम, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि फरीदाबाद) ४९ टक्के, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये (मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे) १८ टक्के, पुणे आणि चेन्नई १६ टक्के, बंगळुरू १२ टक्के, कोलकत्ता आणि अहमदाबाद १० टक्के तर हैदराबादमधील मालमत्तेच्या किंमतीत सर्वात कमी म्हणजेच ३ टक्के वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या दशकभरात दक्षिण – मध्य भारतातील हैदराबादमध्ये मालमत्तेच्या किंमतीत वाढ होत होती, मात्र सध्या ती मंदावत आहे. मात्र देशातील प्रमुख शहरांतील मालमत्तेच्या किंमतीच्या वाढ ही दोन आकडी आहे. त्यामुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये घर घेण्याचे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक गणिते जुळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

‘मालमतेच्या वाढत्या किंमती, वाढती मागणी ही विकासाची शक्यता आणि खरेदीदारांच्या सकारात्मक वृत्तीच्या निदर्शक आहेत. परंतु आपल्या देशातील बहुतांश नागरिक हे घर खरेदी करताना सरकारी योजनांवर अवलंबून असतात. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर किफायतशीर घरांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना सरकारने सुरू केल्या पाहिजेत’, असे मत हाऊसिंग डॉटकॉम आणि प्रॉपटायगर डॉटकॉमचे ग्रुप सीईओ ध्रुव अग्रवाल यांनी व्यक्त केले.

मालमत्तेच्या किंमतीत वाढ का?

बांधकामाचे क्षेत्राशी संबंधित साहित्याच्या वाढत्या किंमती, कामगारांची वाढती मजुरी आणि शहरातील गगनचुंबी इमारतीतील प्रशस्त घरांसाठी असलेली मोठी मागणी, या सर्व बाबी देशातील प्रमुख शहरांतील मालमत्तेच्या किंमतीत वाढ होण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. तसेच मोठमोठे व्यावसायिक, बॉलिवूड अभिनेते आणि क्रीडापटू मुंबईत राहत असल्यामुळे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या देशात ‘मुंबई’ ही सर्वात महागडी निवासी बाजारपेठ असल्याचे देखील या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House prices in mumbai thane increased by 18 percent last year mumbai print news mrj