मुंबई : करोनाविषयक निर्बंध हटविल्यानंतर खासगी कार्यालये सुरू झाली असून अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून कार्यालयीन काम करण्याची दिलेली मुभा बंद केली आहे. शाळाही सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाडेतत्त्वावरील घरांच्या मागणीत वाढ झाली असून घरभाडेही वाढल्याचे निदर्शनास आले आहे. देशातील सात महानगरांतील आलिशान घरांच्या घरभाड्याच्या रक्कमेत मोठी वाढ झाली असून मुंबईतील वरळी परिसरातील आलिशान घरांच्या भाड्यात सर्वाधिक वाढ झाली आहे. वरळीतील २००० चौरस फुटांच्या घरभाड्यात १८ टक्क्यांनी, तर पुण्यातील कोरेगाव पार्क, प्रभात रोड येथील घरभाड्यात सुमारे ८ ते १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

‘अँनरॉक’च्या अहवालानुसार करोनाकाळात मुंबईसह देशभरात भाडेतत्त्वावरील घरांची मागणी आटली होती. याअनुषंगाने घरभाडेही घटले होते. कार्यालये, शाळा बंद होत्या. पण आता सर्व निर्बंध हटविण्यात आले असून कार्यालय आणि शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा भाडेतत्त्वावरील घरांच्या मागणीत वाढ झाली असून घरभाडेही भरमसाठ वाढले आहे. देशातील सात महानगरांतील घरांच्या भाड्यात ८ ते १८ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती या अहवालातून उघड झाली आहे.मुंबईतील वरळी परिसरातील घरांच्या भाड्यात तुलनेत सर्वाधिक १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. येथील २००० चौरस फुटांच्या घराचे भाडे २०२० मध्ये प्रती महिना दोन लाख रुपये होते. आता २०२२ मध्ये ते दोन लाख ३५ हजार रुपये प्रती महिना असे झाले आहे.

हेही वाचा : फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाला हिरवा कंदील ; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

ताडदेवमध्ये २०२० मध्ये प्रती महिना दोन लाख ७० हजार रुपये घरभाडे होते. आता २०२२ मध्ये ही रक्कम प्रति महिना तीन लाख १० हजार रुपयांवर पोहोचली आहे. ही वाढ १५ टक्के आहे.पुण्यातील कोरेगाव पार्क येथे २००० चौरस फुटांच्या घराचे भाडे २०२० मध्ये प्रति महिना ५९ हजार रुपये होते ते आता ६८ हजार रुपये झाले आहे. या परिसरातील घरांच्या भाड्यात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच प्रभात रोड येथील घरभाडे ८ टक्क्यांनी वाढले असून भाड्याची रक्कम ६४ हजार रुपयांवरून ६९ हजारांवर गेली आहे. बंगळुरूत १३ ते १६, चेन्नईत १३ ते १४, हैदराबादमध्ये ११ ते १५, कोलकत्ता येथे ८ ते १० आणि दिल्लीत ११ ते १२ टक्क्यांनी घरभाड्याच्या रक्कमेत वाढ झाली आहे.

Story img Loader