मुंबई : गिरणी कामगारांसाठी राखीव असलेल्या ठाण्यातील रांजनोळी येथील १२४४ घरांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे गिरणी कामगारांसाठीच्या २५२१ घरांची सोडत रखडली आहे. रांजनोळीतील घरांची दुरुस्ती करून सोडत काढावी, अशी मागणी गिरणी कामगार संघटनांकडून करण्यात आली आहे. तर ही घरे कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेने दुरुस्त करून द्यावी, अशी भूमिका मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतली आहे. मात्र कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेने अद्याप याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे घरांच्या दुरुस्तीचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील ५० टक्के घरे गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. यापूर्वी पनवेलमधील कोन येथील एमएमआरडीएच्या गृहप्रकल्पातील २४१८ घरांसाठी सोडत काढण्यात आली आहे. मात्र या घरांच्या दुरुस्तीवरून म्हाडा आणि एमएमआरडीएमध्ये वाद सुरू आहे. या वादामुळे घरांचा ताबा रखडला आहे. मात्र आता म्हाडानेच या घरांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोनमधील घरांचा प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत. आता रांजनोळी येथील १२४४ घरांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा >>> मुंबई : पर्यावरण मंजुरी यापुढे विभागता येणार!, रखडलेल्या गृहप्रकल्पांना होणारा विलंब टळणार?

एमएमआरडीएने ठाण्यातील रांजनोळी येथील मे. टाटा हौसिंग कंपनी लिमिटेडच्या प्रकल्पातील १२४४, रायगड जिल्ह्यातील रायचूर येथील श्री विनय अगरवाल शिलोटर प्रकल्पातील १०१९ आणि कोल्हे येथील मे. सांवो व्हिलेज प्रकल्पातील २५८ अशी एकूण २५२१ घरे गिरणी कामगारांच्या आगामी सोडतीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. या घरांसाठी सोडत काढण्याची तयारी म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुरू केली होती. मात्र ही सोडत आता रखडली आहे.  २५२१ पैकी रांजनोळी येथील १२४४ घरांची पुरती दुरवस्था झाली आहे. दुरुस्ती केल्यानंतरच या घरांचा सोडतीत समावेश करावा, अशी मागणी गिरणी कामगार संघटनांनी केली आहे. त्यामुळे म्हाडाने सध्या सोडतीची तयारी थांबविली. मात्र त्याच वेळी म्हाडाने रांजनोळीतील घरांची दुरुस्ती करण्यास नकार दिला. म्हाडाने नकार दिल्याने कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेने या घरांची दुरुस्ती करावी असा पवित्रा एमएमआरडीएने घेतला आहे.

हेही वाचा >>> मुंबई : शिवडीतील रस्ता काँक्रिटीकरणाच्या प्रतीक्षेत

एमएमआरडीएने याबाबतचे पत्र कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेला पाठविले आहे. महानगरपालिकेने ही घरे करोनाकाळात वापरली असून याच काळात ती खराब झाली आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने त्यांची दुरुस्ती करावी, असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे. दरम्यान, एमएमआरडीएने याबाबत पत्र पाठवून बरेच दिवस झाले तरी महानगरपालिकेने त्याला अद्याप उत्तर दिलेले नाही. एमएमआरडीएनेही हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणतेही पाऊल उचलेले नाही. याचा फटका मात्र सोडत आणि पर्यायाने घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या गिरणी कामगारांना बसत आहे.

पुन्हा पत्र पाठवू

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला या घरांच्या दुरुस्तीबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. मात्र महानगरपालिकेने अद्याप या पत्रावर कोणतेही उत्तर पाठवलेले नाही. त्यामुळे आता लवकरच पुन्हा एकदा महानगरपालिकेला याबाबत पत्र पाठविण्यात येईल, अशी माहिती एमएमआरडीएचे संबंधित वरिष्ठ अधिकारी मोहन सोनार यांनी दिली. तसेच हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लवकरच निर्णय घेऊ – डॉ भाऊसाहेब दांगडे

एमएमआरडीएचे पत्र मिळाले आहे. पण या घरांची पाहणी करून त्यांची दुरुस्ती करणे शक्य आहे का, यासाठी किती खर्च येईल आणि तितका निधी महानगरपालिकेकडे आहे का हे तपासणे अंत्यत महत्त्वाचे आहे. लवकरच याबाबत तपासणी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Houses for mill workers in ranjnoli pedning repair houses mumbai print news ysh
Show comments