Sanjay Nirupam: शिवसेनेचे (शिंदे) नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी शुक्रवारी एक मोठा दावा केला. मुंबईत हाऊसिंग जिहाद होत असल्याचा आरोप केला. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना ते म्हणाले की, काही बिल्डर चलाखी करून मुंबईचा भूगोल बदलू पाहत आहेत. मुस्लीम बिल्डर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) प्रकल्पांमध्ये घोटाळा करत आहेत. सरकारी योजनांमध्ये बांगलादेशींचे नाव सामील केले जात आहे. संजय निरुपम यांनी गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणात एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
शिवसेना नेते संजय निरुपम म्हणाले, मुंबईचा भूगोल बदलण्याचा प्रयत्न काही बिल्डरांकडून केला जात आहे. एसआरएमध्ये नोंदणीकृत असलेले ६० बिल्डर मुस्लीम समुदायाचे आहेत. ते फक्त मुस्लीमबहुल परिसरात काम करतात. मुंबईतील मुस्लीम समुदायाचे आमदारही या बिल्डरांना सहकार्य करत आहेत. या विकासकांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे. तसेच मुस्लीम बिल्डरांनी पुनर्विकास केलेल्या सोसायट्यांमध्ये हिंदूंना घर दिले जात नाही, असाही आरोप त्यांनी केला.
हिंदूंना घर दिले जात नाही
संजय निरुपम यांनी पुढे म्हटले की, मुंबईच्या कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, जोगेश्वरी, वांद्रे, अंधेरी येथील सोसायट्यांमध्ये जिहाद चालला आहे. मुस्लीम बिल्डर त्यांच्या सोसायट्यात जाणूनबुजून मुस्लीम लोकांची संख्या वाढवत आहेत. हिंदू तिथे फ्लॅट विकत घेऊ शकत नाहीत. एखाद्या हिंदू सोसायटीत जेव्हा मुस्लीम व्यक्तीला घर मिळत नाही, तेव्हा संपूर्ण देशात हंगामा होतो. त्यामुळेच मी हा विषय सर्वांसमोर आणत आहे. या विषयाचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीशी काहीही संबंध नाही, असेही त्यांनी सांगितले.
मुंबईला मुस्लिम केंद्र बनविण्याचा प्रयत्न
मुंबईला मुस्लीम केंद्रीत बनविण्याचा प्रयत्न होतोय का? असाही सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केला. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणालाही याबाबत पत्र लिहिले असल्याचे त्यांनी सांगितले.