कांदिवलीमधील एका सोसायटीने आपल्या इमारतीच्या गच्चीवर सौर ऊर्जानिर्मिती सुरू केली असून सोसायटीची गरज भागल्यानंतर अतिरिक्त ठरणारी सौर वीज विद्युतपुरवठा कंपनीला विकून इतर सोसायटय़ांपुढे एक आदर्श ठेवला आहे. या सोसायटीकडून दरमहिन्याला सुमारे १२०० युनिट सौर ऊर्जा पश्चिम उपनगरांमध्ये विद्युतपुरवठा करणाऱ्या कंपनीला पुरवठा केला जात असून त्या बदल्यात नियमित वीज बिलामध्ये सोसायटीला सवलत मिळू लागली आहे.
कांदिवलीमधील एम. जी. रोडवरील डहाणूकर वाडीतील आर्केड भूमी हाइटस् या इमारतीमध्ये सौर ऊर्जानिर्मिती आणि वीजपुरवठय़ाचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. या सोसायटीमध्ये पाण्याचा पंप, जिन्यातील दिवे आदींसाठी दर महिन्याला सुमारे ३,६०० ते ३,७०० युनिट विजेची गरज भासत होती. विजेचे वाढते दर लक्षात घेता सोसायटीला मोठी रक्कम विद्युतपुरवठय़ापोटी वीज कंपनीला भरावी लागत होती. महाराष्ट्र वीज नियामक मंडळाने १० सप्टेंबर २०१५ रोजी इमारतीच्या गच्चीवरील सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्याबाबतच्या नियमांमध्ये नेट मीटिरगचा समावेश केला आहे. त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर सोसायटीतील उपकरणांसाठी करता येतो, तसेच उर्वरित अतिरिक्त वीज विद्युतपुरवठा कंपनीला पुरविता येते. या नियमाचा आधार घेत या सोसायटीतील रहिवाशांनी इमारतीच्या गच्चीवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी सोल्जेन ग्रीनटेक एलएलपी या कंपनीचे अमित शहा यांची मदत घेण्यात आली. आर्केड भूमी हाइटस्मधील चार हजार चौरस फुटांची गच्ची दोन विभागात विभागली गेली आहे. त्यापैकी दोन हजार चौरस फूट जागेत सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचे निश्चित झाले. सोल्जेन ग्रीन टेक एलएलपी कंपनीने सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प या सोसायटीच्या गच्चीवर उभारला. तसेच सौर प्रणालीतून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर पाण्याचा पंप आणि जिन्यांमधील दिव्यांसाठी होऊ लागला. आवश्यकतेपेक्षा अधिक सौर वीजनिर्मिती होत असल्याने अतिरिक्त विजेचा रिलायन्स एनर्जी नेटवर्कला पुरवठा करण्याचा निर्णय सोसायटीने घेतला. त्यासाठी आवश्यक असलेली नेट मीटर युटिलिटी ग्रीडच्या माध्यमातून जनतेच्या वापरासाठी रिलायन्स एनर्जी नेटवर्कला उपलब्ध करण्यास सुरुवात केली. दर महिन्याला सोसायटीकडून रिलायन्स एनर्जीला तब्बल १२०० युनिट विजेचा पुरवठा केला जातो.
दर महिन्याला रिलायन्स वीज कंपनीकडून सोसायटीला सुमारे ३६०० ते ३७०० युनिट वीजपुरवठा करण्यात येतो. आता सोसायटी रिलायन्स एनर्जीला सौर ऊर्जेचा पुरवठा करीत असून तेवढी सवलत रिलायन्स आपल्या बिलामध्ये सोसायटीला देऊ लागली आहे, अशी माहिती सोसायटीचे सरचिटणीस हेमंत पारिख यांनी दिली. सौर ऊर्जा प्रकल्पाचा विस्तार केल्यास अतिरिक्त सौर ऊर्जेची निर्मिती होईल आणि ती रिलायन्स एनर्जीला उपलब्ध केल्यास बिलात आणखी सवलत मिळू शकेल, असा विश्वास हेमंत पारिख यांनी व्यक्त केला.
सोसायटीकडून रिलायन्सला सौर वीजपुरवठा!
कांदिवलीमधील एका सोसायटीने आपल्या इमारतीच्या गच्चीवर सौर ऊर्जानिर्मिती सुरू केली
Written by प्रसाद रावकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-03-2016 at 01:38 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Housing society get solar power from reliance