Mumbai Premium Cars Stolen: मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने आलिशान वाहनांची चोरी करणाऱ्या एका हायटेक टोळीचा भांडाफोड केला आहे. या टोळीकडून ७.३ कोटींच्या १६ आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच सात जणांना अटक करण्यात आली आहे. जीएसटी नंबरच्या माध्यमातून उच्च सिबिल स्कोअर असणाऱ्या लोकांच्या नावे गाड्या विकत घेऊन नंतर त्या काळ्या बाजारात विकण्याचा प्रकार या टोळीकडून केला जात होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी या टोळीला जेरबंद केले. ते म्हणाले, टोळीतील सदस्य मुंबईच्या आसपासच्या भागात राहत होते. आरोपींकडून उच्च सिबिल स्कोअर असणाऱ्या लोकांचा जीएसटी क्रमांक इंटरनेटवर शोधला जायचा. चांगला क्रेडिट स्कोअर असणारी लोक हेरल्यानंतर त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड मिळवले जाई. त्यानंतर टोळीतील सदस्याचा फोटो वापरून त्या व्यक्तीचे बोगस पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनविले जाई.

चांगला सिबिल स्कोअर असल्यामुळे महागड्या आलिशान गाड्या घेण्यासाठी बँकेकडून कर्ज मंजूर केले जाई. आरोपींनी एक घर भाड्याने घेऊन ठेवले होते, बँकेकडून पडताळणी करण्यासाठी या घराचा पत्ता दिला जात असे. एकदा गाडी ताब्यात आल्यानंतर आरोपी त्याचे इंजिन आणि चेसी क्रमांक बदलत. तसेच बोगस आरसी बुक बनवून गाडी परराज्यात नेऊन विकली जात असे.

मागच्या तीन वर्षांत आरोपींनी अशाप्रकारे ३५ गाड्या चोरल्याचा संशय आहे. अटक करण्यात आलेल्या सात आरोपींपैकी तीन जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले. दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, २०१३ मध्ये १६ लाख किंमतीची महिंद्रा थार गाडी चोरी झाल्याचा तपास करत असताना सदर घोटाळा पहिल्यांदा समोर आला होता.