मुंबई: आधार कार्डमधील तुमची गोपनीय माहिती गुन्हेगारांच्या हाती लागली, तर ते किती घातक ठरू शकेल, याचा विचारही आपण करू शकत नाही.  आधार कार्डसंबंधित अशीच गोपनीय माहिती पुरवणाऱ्या मोहम्मद अय्याज हुसेनला (४८) तेलंगणा येथून अटक करण्यात गुन्हे शाखेच्या कक्ष ६ च्या पोलिसांना यश आले आहे. यापूर्वी  याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींना हुसेनने दोन लाख रुपयांमध्ये गोपनीय माहिती पुरवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. सीडीआयआरच्या संगणक प्रणालीतील गोपनीय माहिती आरोपीकडे नेमकी पोहोचली कशी? याबाबत पोलिसही  तपास करीत असून त्याबाबत अधिक तपास करण्यासाठी आरोपीकडील पेनड्राईव्ह सायबर न्यायावैधक परिक्षणासाठी पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई: थेट न्यायालयाच्या आवारातूनच सहा मोबाइलची चोरी; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला प्रकार

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महाराष्ट्र, दिल्लीसह गुजरातमधील नागरिकांचा गोपनीय डेटा चोरी करणाऱ्या निखिल येलगट्टी, मेल्विन आणि भावेश मोदी या तिघांविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यापैकी दोघांना अटक केली होती. निखिल यल्लीगेट्टीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने ‘ट्रेसनाऊ डॉट को डॉट इन’ आणि ‘फोनीवोटेक डॉट कॉम’ नावाचे दोन संकेतस्थळ विकसित केले आहेत. डेटा चोरी करणारी टोळी त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिकांच्या नावावरून किंवा आधार कार्ड जोडलेल्या मोबाइल क्रमांकावरून त्यांचे नाव, पत्ता, जुने बंद झालेले आणि सुरू असलेले मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी, जन्मतारीख, कुटुंबातील सदस्य आदी माहिती मिळवित होती. पुढे ही माहिती खासगी व्यक्ती, कर्ज देणाऱ्या संस्थांना विकण्यात आल्याचे तपासात उघड झाले होते. अटक आरोपीची कसून चौकशी करण्यात आली. अटकेत असलेल्या आरोपींनी हुसेनकडून  एक पेनड्राईव्ह खरेदी केले होते. त्याद्वारे आरोपी देशभरातील नागरिकांचा डेटा मिळवत होते, अशी माहिती उघड झाली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How all aadhaar card information across the country reaches of criminals mumbai print news ysh