मुंबईः अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद (३०) ऊर्फ विजय दास याला रविवारी पहाटे अटक करण्यात आली असून त्याला आता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ल्याची पोलिसांनी तातडीने गंभीर दखल घेतली होती. घटनेच्या तपासासाठी तब्बल १०० पोलीस कार्यरत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सैफ याच्यावरील हल्ल्यानंतर मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेची विविध पथके स्थापन करण्यात आली होती. आरोपीला ठाण्यातील कासारवडीवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रविवारी पहाटे अटक करण्यात आली आहे. तेथे आरोपी हिरानंदानी इस्टेट येथील झाडीमध्ये लपून बसला होता. अखेर त्याला ताब्यात घेऊन वांद्रे येथे आणण्यात आले. त्याला सुरुवातीला चेंबूर पोलीस ठाण्यात व त्यानंतर खार पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. दरम्यान आरोपी शहजाद हा बांगलादेशी घुसखोर असल्याचे निष्पन्न झाले आहे. बांगलादेशातून मुंबईत तो आला होता. मुंबईत त्याच्यासोबत राहणाऱ्या दोघांची शनिवारी गुन्हे शाखेने चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपी मुंबईत हाऊसकिंपींग एजन्सीमध्ये कामाला होता. आरोपीकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्यामुळे त्याच्याविरोधात पारपत्र कायदा व परकीय नागरिक कायद्याअंतर्गत कलमांची वाढ करण्यात आली आहे. आरोपी पूर्वी ठाण्यातील हॉटेलमध्ये कामाला होता.

हेही वाचा – Saif Ali Khan Latest News : सैफवर हल्ला करणारा आरोपी मुंबईत नेमका कुठे वास्तव्याला?

हेही वाचा – Saif Ali Khan : सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर

हल्ल्याच्या दिवशी आरोपी इमारतीत असलेल्या जिन्यावरून चढून आला व सैफचा धाकटा मुलगा जहांगीरच्या खोलीतील शौचालयाच्या खिडकीतून घरात शिरला. त्या हल्ल्यात सैफसह त्याच्या घरातील महिला कर्मचारीही जखमी झाल्या आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How many police work to catch saif ali khan attacker mumbai print news ssb