मुंबई : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय खाद्यतेल मिशन आणि खाद्यतेलात आत्मनिर्भरतेच्या घोषणेनंतर नोव्हेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४ या खाद्यतेल वर्षात १.३१ लाख कोटी रुपये मोजून १५९.५ लाख टन खाद्यतेलाची आयात करण्यात आली. द सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोशिएशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४, या खाद्यतेल वर्षांत देशात १५९.६ लाख टन खाद्यतेलाची आयात करण्यात आली. त्यासाठी तब्बल १.३१ लाख कोटी रुपये (१५.९ अब्ज डॉलर) मोजावे लागले आहेत. गेल्या खाद्यतेल वर्षांत विक्रमी १६४.७ लाख टन खाद्यतेलाची आयात झाली होती, त्यापोटी १.३८ कोटी रुपये मोजावे लागले होते.
केंद्र सरकार सातत्याने खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा करीत आहे. हजारो कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय तेलबिया मिशनही राबविण्यात जात आहे. तरीही खाद्यतेलाची आयात कमी होताना दिसत नाही. यंदाच्या खाद्यतेल वर्षांत एकूण खाद्यतेल आयात सहजपणे १६५ लाख टनांवर गेली असती. पण, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४ सप्टेंबर २०२४ रोजी कच्चे सोयाबीन, पामतेल आणि सूर्यफूल तेलावर २७.५ टक्के आणि शुद्ध पामतेल, सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलावर ३५.७५ टक्के आयात शुल्क लागू करण्यात आले.
जागतिक बाजारात पाम तेलाचे दर वाढल्यानंतर भारतीय आयातदारांनी एक लाख टन पामतेल आयातीचे सौदे रद्द केले होते. त्या परिणामी आयात १५९.६ लाख टनांवर स्थिरावली आहे. तरी यंदाच्या वर्षांत १९.३ लाख टन शुद्ध पामतेल, ६९ लाख टन कच्चे पामतेल, ३४ लाख टन सोयाबीन, ३५ लाख टन आणि सूर्यफूल तेलाची आयात झाली आहे. देशनिहाय आयातीचा विचार करता, इंडोनेशियातून सर्वांधिक ४८ लाख टन, मलेशियातून ३२ लाख टन, थायलंडमधून ०.७७ लाख टन, अर्जेंटिनामधून २५ लाख टन, ब्राझीलमधून ०.९५ लाख टन, युक्रेनमधून ०.५७ लाख टन, रोमानियातून ०.६३ लाख टन आणि रशियातून २० लाख टन खाद्यतेलाची आयात झाली आहे.
पुढील वर्षांत आयात घटणार!
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाच लाख टनांनी आयात घटली आहे. पुढील वर्षांत साधारणपणे दहा लाख टनांनी आयातीत घट होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचे १०३.६० लाख टन आणि भुईमुगाचे १३३.६० लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. तसेच पाण्याची चांगली उपलब्धता असल्यामुळे मोहरीच्या उत्पादनातही वाढ होण्याचा अंदाज आहे. तेलबिया उत्पादन सरासरीच्या तुलनेत २५ ते ३० लाख टनांनी वाढण्याचा अंदाज असून, त्यापासून १० ते १२ लाख टन अतिरिक्त खाद्यतेल उत्पादन होण्याचा अंदाज आहे. तेलबियांचे एकूण उत्पादन ३८० ते ४०० लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील वर्षांत खाद्यतेलाची आयात दहा लाख टनांनी कमी होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती द सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोशिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. भारत मेहता यांनी दिली.