मुंबई : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी सहा दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे राज्यभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मुदतवाढीचा फायदा मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना होणार आहे.

सोयाबीन खरेदीची पहिली मुदत १२ जानेवारीपर्यंत होती, ती वाढवून ३१ जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीला परवानगी देण्यात आली होती. तरीही खरेदी केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्याने आणि शेतकऱ्यांचा रोष कायम असल्यामुळे पणन विभागाने केंद्र सरकारकडे सहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. पणन विभागाच्या मागणीला मंजुरी देत केंद्र सरकारने सहा फेब्रुवारीपर्यंत खरेदीला मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीचा मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

दरम्यान, राज्यातील ५६२ खरेदी केंद्रांवर ३० जानेवारीपर्यंत ९ लाख ४२ हजार टन सोयाबीनचे खरेदी करण्यात आली होती. ३१ जानेवारीपर्यंत दहा लाख टनापर्यंत खरेदी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सोयाबीन खरेदी पहिल्यांदा बारदाना आणि अन्य कारणांमुळे रखडली होती. खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्याने सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती.

खरेदीचे उद्दिष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न

पणन विभागाच्या वतीने केंद्र सरकारकडे केलेली मागणी मान्य करण्यात आली आहे. सोयाबीन खरेदी सहा फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. लातूर सारख्या सोयाबीन उत्पादन जिल्ह्यांना खरेदीचा कोटा वाढवून दिला आहे. राज्याला १४ लाख १३ हजार २७० टन खरेदीचे उद्दिष्टे होते, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती पणन मंत्री – जयकुमार रावल यांनी दिली.

Story img Loader