Mumbai Air Quality Index News in Marathi : मुंबईतील हवेचा दर्जा सलग तिसऱ्या दिवशी खालावलेला आहे. सोमवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार मुंबईच्या हवेची गुणवत्ता अतिवाईट स्वरूपाची होती. मालाड येथे सोमवारी अतिवाईट हवेची नोंद झाली. तिथे हवा गुणवत्ता निर्देशांक ३०७ नोंदवला गेला. कुलाबा येथे २०७, बोरिवली येथे २२३, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे २२३ होता. मागील तीन दिवस पावसाच्या शिडकाव्यामुळे सुधारलेली हवा फटाक्यांनी पुन्हा खराब केली. तर, पीटीआयने दाखवलेल्या व्हिडीओनुसार मुंबईतील वायू प्रदूषण स्पष्ट दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह मुंबईत वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे, वाहनांचा धूर यामध्ये फटाक्यांच्या धुराची भर पडल्यामुळे दिवाळीमध्ये प्रदूषण नेहमीच वाढते. हे लक्षात घेऊन उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर वेळेचे बंधन घातले होते. मात्र ही मर्यादा कुठेही पाळली गेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तब्बल ७८४ गुन्हे दाखल केले आहेत. तर, ८ ते १० या वेळेमर्यादेपलिकडे जाऊन फटाके फोडणाऱ्या ८०६ जणांविरोधात कारवाई करण्यात आली.
फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता पातळी अत्यंत खालावली असून अतिशय गंभीर बनली आहे. त्यामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी श्वसनासंबंधीचे आजार वाढले आहेत. पीटीआयने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओनुसार, वांद्रे-वरळी सी लिंकवर धुराचे स्तर जमा झाले आहेत. मुंबईतील ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरता पालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत.
मुंबईत ३५ ठिकाणी आगी
मुंबईत गेल्या तीन दिवसांत ३५ ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्या. फटाक्यांमुळे या दुर्घटना घडल्या असल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली आहे. दरम्यान, नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळावा. प्लास्टिकचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशवीचा वापर करावा. तसेच पर्यावरणपूरक, प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करावी,असे आवाहन पालिकेने केले आहे. दिवाळीत फटाक्यांमुळे ठिकठिकाणी आग लागण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या काळात आग लागल्यास क्रमांक १०१ वा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.