मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मध्यरात्रीपासूनच पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील रेल्वे व रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच विविध परिसरातील सकल भागांत पाणी साचल्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मुंबईतील पूर्व उपनगरांत सर्वाधिक सरासरी १६८.६८ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. पूर्व उपनगरांतील एमसीएमसीआर पवई परिसराला पावसाने अक्षरशः झोडपले असून तेथे ३२९.४० मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तसेच, पवईतील पासपोली मनपा शाळा परिसरात ३२७.४० मिलीमीटर पाऊस पडला आहे.
पूर्व उपनगरापाठोपाठ पश्चिम उपनगरांत सर्वाधिक सरासरी १६५.९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरातील मालपा डोंगरी मनपा शाळेच्या परिसरात सर्वाधिक ३०३.८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच चकाला मनपा शाळा परिसरात २९७.२० मिलीमीटर पाऊस पडलेला आहे.
हेही वाचा – मुंबई : आज दुपारी समुद्राला मोठी भरती, सुमारे चार मीटरपर्यंत लाटा उसळणार
हेही वाचा – मुंबईत रेल्वे प्रवाशांना एसटीचा आधार
मुंबई पूर्व व पश्चिम उपनगरानंतर मुंबई शहर परिसरातही पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. मुंबई शहर भागात सरासरी ११५.६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहरात सर्वाधिक पावसाची नोंद शीव येथील प्रतीक्षा नगर मनपा शाळा परिसरात झाली आहे. तेथे २४८.२० मिलीमीटर पाऊस झाला. शिवडी कोळीवाडा मनपा शाळा परिसरात २१२.८० मिलीमीटर पाऊस पडला. त्यापाठोपाठ रावळी कॅम्प १९८.११, बी नाडकर्णी पार्क मनपा शाळा परिसरात १८९.२० आणि धारावी काळा किल्ला मनपा परिसरात १८६.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली. मुंबई महानगरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.