मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय  मंत्रिमंडळाच्या बैठकीत आगामी खरीप हंगामासाठी खत अनुदानाला मंजुरी दिली. स्फुरद (फॉस्फेट) आणि पालाश (पोटॅश) खतांसाठी पोषक तत्त्वावर आधारित अनुदान (एनबीएस) दरांना मान्यता दिली. जून ते सप्टेंबर या कालावधीत वापरात येणाऱ्या खतांसाठी ३७,२१६.१५ कोटी रुपयांचे खत अनुदान देण्यात येणार आहे.

नत्र, स्फुरद पालाश (एनपीके) खतांच्या श्रेणी सह अन्य संयुक्त खाते शेतकऱ्यांना अनुदानित, परवडणाऱ्या आणि वाजवी दरात उपलब्ध होण्यासाठी हे अनुदान जाहीर केले जाते. ‘सिंगल सुपर फॉस्फेट’ (एसएसपी) वरील मालवाहतूक अनुदानालाही खरीप हंगामापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आगामी खरीप हंगामासाठी वाजवी दरामध्‍ये खते उपलब्ध करून देण्‍यासाठी ३७,२१६.१५ कोटी रुपयांच्या एनबीएस अनुदानाला मंत्रिमंडळाने दिली मान्यता दिली आहे. हे अनुदान २०२४ – २५ च्या रब्बी हंगामाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपेक्षा अंदाजे १३,००० कोटी रुपयांनी जास्त आहे.

खत अनुदानामुळे शेतकऱ्यांना अनुदानित, परवडणाऱ्या आणि वाजवी किमतीत खतांची उपलब्धता सुनिश्चित होते. खते आणि निविष्ठांच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे खत अनुदानात ही वाढ केल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत खते उपलब्ध व्हावीत, यासाठी मंजूर आणि अधिसूचित दरांनुसार खत कंपन्यांना हे अनुदान दिले जाईल.