मुंबई : राज्यात २६ जानेवारीअखेर ५१ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. खासगी आणि सहकारी १९६ कारखान्यांनी ५७ लाख टन ऊस गाळप करून सरासरी ८.९८ टक्के साखर उताऱ्यासह ५० लाख टन साखर उत्पादनाचा टप्पा पूर्ण केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात तब्बल एक महिना उशिराने, १५ नोव्हेंबरपासून साखर हंगाम सुरू झाला. ऊसतोडणी आणि गाळपाला गती येण्यासाठी डिसेंबरअखेर उजाडला होता. जानेवारी महिन्यात पूर्ण क्षमतेने गाळप सुरू झाले. ऊस गाळपात कोल्हापूर विभागाने आघाडी घेतली आहे. १४० लाख टन ऊस गाळप करून १४ लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. पुणे विभागात १३६ लाख टन ऊस गाळप होऊन, १२ लाख टन, सोलापूर विभागात ९८ लाख टन गाळप होऊन ७ लाख टन, नगर विभागात ७३ लाख टन गाळप होऊन, ६ लाख टन, छत्रपती संभाजीनगर विभागात ५१ लाख टन गाळ होऊन, ३ लाख टन, नांदेड विभागात ६५ लाख टन गाळप होऊन, ६ लाख टन आणि नागपूर विभागात सहा लाख टन गाळप होऊन एक लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

साखर उताऱ्यात कोल्हापूर आघाडीवर असून, १०.६३ टक्के साखर उतारा मिळाला आहे. नागपूर विभागात सर्वात कमी ४.८४ टक्के साखर उतारा मिळाला आहे. सहकारी आणि खासगी प्रत्येकी ९८, असे १९६ साखर कारखान्यांनी गाळप दैनंदिन ९.७५ लाख टन क्षमतेने गाळप केले आहे.

साखर उत्पादन ९५ लाख टनांवर जाणार

राज्याचे साखर उत्पादन ९५ लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. २६ जानेवारीअखेर ५० लाख टन उत्पादन झाले आहे. आणखी ४० ते ४२ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. मजुरांअभावी ऊसतोडणी यंत्रणा विस्कळीत झाली आहे. कमी क्षेत्रामुळे ऊसतोडणी यंत्राचा वापर करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मजुरांवर अवलंबून रहावे लागत आहे. यापुढे ऊसतोडणी मजुरांची टंचाई जाणविणार आहे. यंदा गाळप हंगाम वेळेत संपविण्याचे आव्हान आहे, अशी माहिती राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How much sugar has been produced in maharashtra and how much will be produced mumbai print news amy