मुंबईत स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मुंबईतील लहानशच्या झोपडीतही स्वतःचं घर असणं आजच्या काळात फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सी व्ह्यू घराची कल्पना म्हणजे सामान्य नागरिकांसाठी कल्पनेपलिकडचं आहे. आता एका मोठ्या व्यावसायिकाने वरळीतील सी व्ह्यू असलेले एक अपार्टमेंट विकत घेतले आहे. या अपार्टमेंटची किंमत तब्बल ९७ कोटींहून अधिक आहे. किरण जेम्चे संचालक राजेश लाभूभाई लखानी असं या मोठ्या व्यावसायिकाचं नाव आहे.
दि इकॉनॉमिक्स टाईम्सच्या अहवालानुसार, १४ हजार ९११ चौरस फूट कार्पेट क्षेत्र असलेल्या हे विस्तारित अपार्टमेंट डॉ. अॅनी बेझंट रोडवरील सुपर प्रीमिअम निवासी टॉवर थ्री सिक्स्टी वेस्टच्या ४४ व्या मजल्यावर आहे. लखानी यांनी कुटुंबातील दोन सदस्यांसह संयुक्तपणे मालमत्ता खरेदी केली असून या व्यवहाराची नोंदणी २९ मे रोजी झाली. या घरासाठी तब्बल ५.८४ कोटी रुपयांहून अधिक मुद्रांक शुल्क भरले आहे.
हेही वाचा >> घाटकोपर दुर्घटना: फलकाची सदोष संरचना, ‘व्हीजेटीआय’चा अहवाल मुंबई महापालिका प्रशासनाला सादर
एप्रिलमध्ये त्याच टॉवरमध्ये ४७ व्या मजल्यावर किरण जेम्सचे व्यवस्थापक संचालक मावजीभाई पटेल यांनी ९७ कोटींना घर विकत घेतले होते. त्यानंतर आता राजेश लालूभाई लखानी यांनी त्याच टॉवरमध्ये घर खरेदी केले. लखानी यांनी थेट स्कायलार्क बिल्डकॉन आणि सहाना ग्रुपच्या मून रे रियल्टीकडून हा व्यवहार केला आहे. ओबेरॉय रियल्टीबरोबर स्कायलार्क बिल्डकॉन आणि सहाना ग्रुपच्या मून रे रियल्टीने हा प्रकल्प संयुक्त भागीदारीतून विकसित केला आहे.
दक्षिण मुंबईत वाढली घरांची किंमत
किरण जेम्सची स्थापना १९८५ मध्ये झाली. ही कंपनी हिरे आणि मौल्यवान दगडांमध्ये पारंगत आहे. २०२३ नंतर ही भारतातील सर्वांत महागडी मालमत्ता खरेदी आहे. मुंबईत गेल्या काही वर्षांत सातत्याने मालमत्तांच्या किमतीत वाढ होत आहे. भारतात सर्वांत महागडे घर दक्षिण आणि मध्य मुंबईत आहेत. गेल्या काही वर्षांत या भागांमध्ये उद्योगपती, अधिकारी, अभिनेते आणि क्रिडा क्षेत्रातील लोकांनी येथे घरे खरेदी केले आहेत.