विश्वासार्हतेचं दुसरं नाव म्हणजे टाटा असं म्हटलं जातं. या कंपनीमध्ये काम करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. कंपनीचे सर्वोसर्वा रतन टाटा हे तर जगभरामध्ये त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र याच रतन टाटांनी चक्क एका २७ वर्षाच्या मुलाला फोन करुन तू माझ्याबरोबर काम करणार का अशी विचारणा केली. हो तुम्हाला हे खरं वाटणार नाही पण खरोखरच टाटांनी शंतनू नायडू या तरुणाला फोन करुन स्वत: कामाची ऑफर दिली. यासंदर्भातील शंतनूचा प्रवास सांगणारी एक पोस्ट ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ने शेअर केली आहे.
‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ हे पेज फेसबुकवर प्रचंड लोकप्रिय आहे. या पेजवर काही दिवसांपूर्वी शंतनूची कहाणी पोस्ट करण्यात आली आणि पाहता पाहता ती व्हायरल झाली. यामध्ये त्याने आपली रतन टाटांशी भेट कशी झाली आणि नक्की तो काय करतो याबद्दलची माहिती दिली आहे.
पहिल्या भेटीचा किस्सा…
रतन टाटांशी भेट कशी झाली याबद्दल बोलताना शंतनू या सर्वांची सुरुवात कुत्र्यांबद्दल असणाऱ्या प्रेमामुळे झाली असं सांगतो. “मी २०१४ मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टाटा ग्रुपमध्ये काम करु लागलो. सगळं काही छान सुरु होतं. मात्र एक दिवस अचानक ऑफिसमधून घरी जाताना मला एका कुत्र्याचा मृतदेह रस्त्याच्या मधोमध पडलेला दिसता. मला कुत्र्यांची खूप आवड आहे. मी अनेकदा कुत्र्यांना वाचवलंही होतं. त्यामुळे तो मृतदेह पाहून मला खूप दु:ख झालं. मी तो मृतदेह रस्त्यावरुन बाजूला घेण्याचा विचार करत होतो आणि तितक्यात एक गाडी त्या मृतदेहाला चिरडून निघून गेली त्यावेळी मला अगदी कसंतरी वाटलं. मला याबद्दल काहीतरी करावं लागेल याची जाणीव झाली. त्यामुळे मी माझ्या काही मित्रांना फोन केला आणि ‘कॉलर रिफलेक्टर’ तयार केला. त्यामुळे हे रिफलेक्टर गळ्यात असणारे कुत्रे वाहन चालकांना खूप लांबूनही दिसतील.
हे रिफलेक्टर काम करेल की नाही मला ठाऊक नव्हतं. मात्र दुसऱ्याच दिवशी मला फोन आला आणि या कॉलरमुळे एका कुत्र्याचा जीव वाचल्याचे मला समोरच्याने सांगितले. तेव्हा मला खूप आनंद झाला.माझ्या कामाची खूप चर्चा झाली आणि टाटा ग्रुपच्या कंपन्यांच्या वृत्तपत्राने माझ्या कामाची दखल घेतली. अनेकांना या रिफलेक्टर कॉलर विकत घ्यायच्या होत्या मात्र आमच्याकडे त्या तयार करण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला एक सल्ला दिला. टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनाही कुत्र्यांबद्दल भरपूर प्रेम आहे त्यांना तू पत्र लिहून याबद्दल कळव असं मला वडिलांनी सुचवलं. आधी मी नकार दिला. नंतर मात्र मी स्वत:च्या अक्षरात एक पत्र लिहून रतन टाटा यांना पाठवले. काही दिवसांनी मी त्या पत्राबद्दल विसरूनही गेलो. मात्र त्यानंतर काही दिवसांनी मुंबईमधील ऑफिसमध्ये ते मला भेटले आणि “तुझ्या कामाने मी प्रभावित झालो आहे” असं सांगितलं. आजही तो प्रसंग सांगताना माझ्या अंगावर काटा येतो. त्यानंतर त्यांचे आवडते कुत्रे ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि आमच्या मैत्रीला सुरुवात झाली. अर्थात नंतर त्यांनी आमच्या रिफेलक्टर कॉलरच्या मोहिमेला आर्थिक मदत केली,” असं शंतनूने सांगितले.
मात्र टाटा यांच्याशी ओळख झाल्यानंतर अचानक शंतनूने नोकरी सोडून परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळी त्याने रतन टाटांना एक आश्वासन दिलं. याबद्दल बोलताना “मी शिक्षणासाठी परदेशात गेलो. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी माझं संपूर्ण आयुष्य टाटा ट्रस्टमध्ये काम करण्यासाठी देईन असं आश्वासन मी रतन टाटांना दिलं. त्यांनी मला हसत हसत होकार दिला,” असं शंतनू सांगतो.
आणि तो कॉल आला…
रतन टाटा यांनी समोरुन कॉल करुन मला असिस्टंट होण्याची ऑफर दिल्याचंही शंतनूने सांगितले आहे. “मी शिक्षण पूर्ण करुन जेव्हा भारतात परत आलो तेव्हा त्यांनी मला फोन केला. “माझ्या ऑफिसमध्ये करण्यासारखं बरचं काम आहे. तू माझा असिस्टंट होशील का?,” असं त्यांनी मला विचारलं. काय बोलू मला समजत नव्हतं. मी एक मोठा श्वास घेतला आणि ‘हो’ असं उत्तर दिलं,” हे सांगताना शंतनूच्या चेहऱ्यावर आपसूकच हसू आलं.
रतन टाटा बॉस नाही तर…
“मी मागील १८ महिन्यांपासून त्यांच्याबरोबर काम करत आहे. मात्र आजही अनेकदा मी स्वत:ला चिमटा काढून हे स्वप्न तर नाही ना याची खात्री करुन घेतो. चांगला मित्र, चांगला मार्गदर्शक आणि चांगला बॉस मिळावा म्हणून माझ्या वयाचे तरुण झगताना दिसतात. अशावेळी माझा माझ्या नशिबावर विश्वास बसत नाही हे सारं मला रतन टाटा नावाच्या एका सुपर ह्युमनमध्ये मिळालं आहे. लोकं त्यांना बॉस म्हणतात पण मी त्यांना मिलेनियल डंबलडोर असं म्हणतो. हे नाव त्यांना अगदी योग्य वाटतं,” असंही शंतनूने ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी बोलताना सांगितलं आहे
‘युआर स्टोरी’ या वेबसाईटनुसार आज शंतनू रतन टाटांबरोबर अनेक ठिकाणी फिरतो. अनेकदा नवीन स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात सल्ले रतन टाटा शंतनूकडून घेतात.