लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत वरळीमध्ये २२ मजल्यांऐवजी ४० मजली पुनर्विसित इमारती बांधण्यात येणार आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाने काही कारणांमुळे वरळीतील पुनर्विकास प्रकल्पाच्या आराखड्यात बदल केला आहे. मात्र यामुळे आम्हाला फटका बसण्याची शक्यता अधिक आहे, असे मत व्यक्त करीत राहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्वसामान्य रहिवाशांना ४० मजली इमारतीचा देखभाल खर्च कसा परवडणार, असा प्रश्नही रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि मनसेच्या मागणीनुसार मुंबई मंडळाने प्रकल्पाच्या सुधारित आराखड्याबाबत वरळीतील रहिवाशांना माहिती देण्यासाठी शुक्रवारी जांबोरी मैदानात सादरीकरण केले. यावेळी मोठ्या संख्येने रहिवासी, म्हाडाचे अधिकारी तसेच मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी, उत्तम सांडव आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा… मुंबई: मोटारगाडी चालकाला टेम्पोखाली चिरडले; टेम्पोचालक अटकेत

मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. रहिवाशांची पात्रता, स्थलांतर, इमारती पाडणे आणि पुनर्विकसित इमारतींचे बांधकामही सध्या सुरू आहे. दरम्यान, वरळीच्या आराखड्यात मंडळाने मोठे बदल केले आहेत. या बदलानुसार आता काम केले जात आहे. मात्र मंडळाच्या सुधारित आराखड्यावर मनसे आणि स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. मनसेच्या नेत्यांनी या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाचे सादरीकरण करण्याचे निर्देश मंडळाला दिले होते. त्यानुसार शुक्रवारी हे सादरीकरण झाले. यावेळी रहिवाशांनी उंच इमारतीच्या देखभाल खर्चाचा प्रश्न प्राधान्याने उपस्थित केला.

हेही वाचा… ‘मेट्रो ४’ मार्गिकेतील लक्ष्मीनगर मेट्रो स्थानकाचा मार्ग मोकळा

मंडळाने १२ वर्षे इमारतीच्या देखभालीची हमी दिली आहे. मात्र १२ वर्षानंतर काय? वरळीत सर्वसामान्य कुटुंब राहतात. त्यांना देखभाल खर्च कसा परवडणार, असा प्रश्न वरळीतील रहिवासी विनोद केसरकर यांनी उपस्थित केला.

हेही वाचा… ‘त्या’ जाहिरातीमुळे सचिन तेंडुलकरची मुंबई क्राईम ब्रँचकडे धाव, फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

आराखड्याला कोणाचाच विरोध नाही. मात्र हा पुनर्विकास नेमका कसा होणार आणि यात सुविधा काय असणार, असे प्रश्न राहिवाशांच्या मनात होते. सादरीकरणानंतर रहिवाशांना प्रकल्पाची माहिती मिळाली आहे. आता आणखी एक बैठक घेऊन राहिवाशांच्या मनातील प्रश्नांचे समाधान करण्यात येईल. समाधान झाल्यानंतरच सदर विकास आराखड्याला मंजुरी दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे संदीप देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to afford the maintenance cost of forty floors building asked by worli bdd chawl residents in mumbai print news dvr